लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त अथवा डीएड, बीएड पात्रताधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. निवृत्तीनंतर शाळेत रुजू होणाऱ्या शिक्षकांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियमित दोन शिक्षक कार्यरत आहेत. तेथील एका शिक्षकाचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येणार असून, ही प्रक्रिया पंचायत समितीस्तरावर पार पडणार आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास रिक्त असलेल्या पदावर बीएड, डीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येऊ शकते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याची ओरड करण्यात येते. पवित्र पोर्टलमधून शिक्षकांची पदे भरण्यात आली. तसेच कंत्राटी तत्त्वावर रिक्त जागा भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियमित दोन शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे या शाळेत एका सेवानिवृत्त अथवा बेरोजगार पात्रताधारक शिक्षकाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकाची वयोमर्यादा ७० वर्षे राहील. कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकाला केवळ सहा महिन्यांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर गुणवत्ता व योग्यता विचारात घेऊन नियुक्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार या निर्णयाची प्रशासनाकडून अंमलबजावणी होईल.
निवृत्तीवेतन आणि मानधनही
- सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेत नियुक्ती मिळाल्यावर महिन्याला १५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या शिक्षकांना आधीच घसघशीत निवृत्तीवेतनही मिळते.
- नियुक्ती देताना शासन पात्रताधारक डीएड, बीएड बेरोजगारांचा आधी विचार करीत नाही. शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात येत असल्याने पात्रताधारकांतून नाराजीचा सूरही उमटत आहे.
पटसंख्या वाढल्यास नियमित शिक्षक२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र, शाळेची पटसंख्या २० पेक्षा जास्त वाढल्यास नियमित शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. तोपर्यंत कंत्राटी शिक्षकाची सेवा घेण्यात येईल
शिक्षण विभागाकडून माहितीची गोळाबेरीजजिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाची मानधनावर नियुक्त्ती करायची आहे. दोन शिक्षक कार्यरत असल्याने एका शिक्षकाची समुपदेशनाने बदली करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला असून, माहितीची गोळाबेरीज सुरू करण्यात आली आहे.
दोन शिक्षक आहेत कार्यरत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दोन नियमित शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील एका शिक्षकाची जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पंचायत समितीस्तरावर पार पडेल.