यवतमाळ नगरपरिषद : वाढीव क्षेत्रातील २५८ सिमेंट रस्ते सुरेंद्र राऊत यवतमाळ नगरपरिषदेत समाविष्ठ झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील २५८ सिमेंट रस्त्यांच्या कामाची निविदा नगरपरिषदेने राजकीय कंत्राटदारांसाठी रद्द केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. १६ कोटी ५० लाख रुपयांची ही कामे आता एकत्र करून राजकीय कंत्राटदारांना देण्याचा घाट नगरपरिषदेने घातला आहे. यवतमाळ नगरपरिषदेने वाढीव क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून १६ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त केला. त्यात प्रत्येक रस्त्याची स्वतंत्र प्राकलन बनविण्यात आले. त्याला नगरपरिषदेच्या विशेष सभेत २ फेब्रुवारी रोजी मंजूर देण्यात आली. या ठरावाचे सूचक खुद्द बांधकाम सभापती रेखा कोठेकर तर अनुमोदक नियोजन सभापती शैलेंद्रसिंह दालवाला आहे. या ठरावाला प्रशासकीय मान्यता देताना कामाच्या यादी प्रमाणे कार्यादेश द्यावा असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सदर कामांना प्रशासकीय मंजुरात देण्याचा प्रस्ताव २१ मार्च रोजी नगरविकासचे अवर सचिव यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरात देऊन २२ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठविला. त्याच तारखेत जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांना मंजुरी दिली. ई-निविदा पद्धतीने कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. १ आॅगस्टपासून शहरातील विविध कंत्राटदारांनी आॅनलाईन निविदा अपलोड केल्या. मोठ्या कामापासून राजकीय कंत्राटदार वंचित राहिल्याची कुणकुण लागली. राजकीय कंत्राटदारांचे हित जोपासण्यासाठी नगरपरिषदेतील यंत्रणेवर दबाव आणण्यात आला. केवळ राजकीय पाठबळ असलेल्या कंत्राटदारांचे हितसंबंध जोपासत निविदा रद्द केल्या. हा प्रकार नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
राजकीय कंत्राटदारांसाठी १६ कोटींच्या निविदा रद्द
By admin | Published: August 19, 2016 1:09 AM