१२२ कोटींचा निधी : ७ हजार १६२ शेतकरी जोडणीच्या प्रतीक्षेत यवतमाळ : जिल्ह्यातील वीज वितरणासाठी पायाभूत सुविधांची उणीव आहे. त्यामुळेच ३० मार्च अखेरपर्यंत ७ हजार १६२ शेतकरी कृषी पंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना योग्य दाबाचा वीज पुरवठा देण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत तब्बल १६ उपकेंद्रांची कामे प्रस्तावित केली आहे. त्यावर १२२ कोटी ९१ लाख खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याने सिंचनावर भर देण्यात आला. अनेक शेतकरी केवळ वीज जोडणी नसल्याने सिंचन करू शकत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पहिल्यांदा झाला. ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणी आहे, त्यांनाही योग्य दाबात वीज पुरवठा मिळत नसल्याने सिंचन करणे शक्य होत नाही. ही समस्या पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. आता यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून जिल्ह्याकरिता ७६२ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून ही कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये ३३ केव्ही उपकेंद्र, कार्यरत उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र उभारणे, ३३ केव्ही आणि ११ केव्ही वाहिन्या टाकणे, लघुदाब वाहिनी, वितरण रोहित्र याचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ कोटी ७० लाखांची कामे प्रस्तावित असून, त्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळातील रुईवाई, सावरगड, बाभूळगावात घारफळ, कोटंबा, दाभा, राळेगावमध्ये वडकी, आर्णी येथे मांगलादेवी, लोणी, सदोबा सावळी, पुसदमध्ये सावरगाव, उमरखेडमध्ये पोफाळी, मरसूळ, दारव्हा येथे वडगाव गाढवे, चाणी कामठवाडा, मानकिन्ही, दिग्रसमध्ये तिवरी, तुपटाकळी, महागावमध्ये अनंतवाडी, मुडाणा, पेंढी, मारेगावमध्ये करणवाडी, मार्डी झरीजामणीमध्ये माथार्जून, केळापूरमध्ये करंजी, बोरी, मोहदा, वणीमध्ये शिरपूर, साखरा, कायर-शिंदोला, घाटंजीमध्ये कुंभारी, नेरमध्ये शिरसगाव याठिकाणी वीज उपकेंद्र प्रस्तावित आहेत. त्याचेही काम सुरू आहे. जिल्ह्यात तब्बल ३० हजार ४०० घरगुती वीज मीटर बदलविण्यात येणार आहे. सुरळीत आणि शाश्वत वीज पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्रह बदल प्रस्तावित आहे. त्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील मंजूर आरखड्यानुसार कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडणीसाठी १६ वीज उपकेंद्र
By admin | Published: April 16, 2016 1:53 AM