नेर (यवतमाळ) : तालुक्यातील शहापूर येथे १६ ते १७ वर्षीय बालकाचा गळा चिरून खून केला. त्याची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप करण्यात आला. या बालकाचा मृतदेह शहापूर शिवारात वाहनाने आणून टाकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांतील हा तिसरा खून आहे.
शहापूरचे पोलीस पाटील रमेश पवार यांना ग्रामस्थांनी एका शेतात नाल्यामध्ये मृतदेह पडून असल्याचे सांगितले. शेतकरी धनू पवार याच्या शेताजवळ हा मृतदेह होता. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता १६ ते १७ वर्षे वयोगटातील बालकाचा तो मृतदेह असल्याचे आढळून आले. मारेकऱ्यांनी त्याचा गळा चिरला व नंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा विद्रूप केला. त्या मृतकाच्या अंगात लाल व काळ्या रंगाचा टीशर्ट, निळ्या रंगाची नाइट पॅन्ट आहे. वर्ण गोरा असून घटनास्थळाजवळ वाहनाचे टायर मार्क दिसतात.
या घटनेची माहिती पोलीस पाटील रमेश पवार यांनी नेर ठाणेदारांना दिली. त्यावरून ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोलीस पथकाला पाचारण केले. मृतदेह ताब्यात घेतला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी या बालकाचा खून का केला, हेही यातूनच उघड होणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात खुनाचे सत्र
नेर तालुक्यात आठ दिवसांपासून खुनाचे सत्र सुरू आहे. कोहळा पुनर्वसन येथे भावाने बहिणीची हत्या केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी कोलुरा येथे पतीने पत्नीची हत्या केली. बुधवारी शहापूर शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. सततच्या या खळबळजनक घटनांमुळे तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे.