महागाव : तालुका सुरुवातीपासूनच कोरोनाचा हाॅटस्पाॅट राहिला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही दहशत पसरली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी महागाव तालुक्यातील साधूनगर येथे गेला होता. मात्र, आता दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकूण १७९३ बाधितांपैकी वर्षभरात १६३७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.
सुरुवातीला तालुक्याचा पाॅझिटिव्हिटी रेट जास्त होता. आता तो खाली आला आहे. नवीन रुग्णही फार कमी प्रमाणात आढळत आहेत. लसीकरणाबाबत मात्र अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तालुका प्रशासनाच्या वतीने त्यादृष्टीने प्रयत्नही होताना दिसत नाहीत.
तालुक्यात सध्या ११७ नागरिक पाॅझिटिव्ह आहेत. त्यात शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३४ हजार ९६६ नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजन टेस्टचा त्यात समावेश आहे. तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण मे २०२० रोजी साधूनगर येथे आढळून आला होता, तर कोरोनाचा पहिला बळी याच गावात जून २०२० मध्ये नोंदविला गेला. एका ३५ वर्षीय सराफा व्यावसायिकाचा कोरोनाने बळी घेतला होता. तालुक्यात सुरुवातीपासून आतापर्यंत शासकीय आकडेवारीनुसार ३९ नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचाही समावेश आहे.
कोट
१६ जानेवारीपासून आतापर्यंत तालुक्यात दहा हजार १८२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गावागावात वर्दळीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या सुरू आहेत; परंतु ग्रामीण भागात लग्नांमध्ये गर्दी पाहायला मिळते.
- डाॅ. जब्बार पठाण
तालुका आरोग्य अधिकारी, महागाव.