रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने जिल्हाभरात चार लाख ९२ हजार ५१८ ग्राहकांना विजेचे कनेक्शन दिले आहे. यामध्ये कृषीपंपधारकांकडून वीज बिलाची वसुली झालीच नाही. यासह घरगुती ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी कायम आहे. यामुळे थकबाकीचा आकडा १६९६ कोटींच्या घरात पोहोचला आहे. लाॅकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. अवास्तव बिल आल्याचा आरोप ग्राहकांकडून झाला. यावर मार्गदर्शन करणारे ऑनलाईन चर्चासत्रही झाले. यामुळे वसुलीची माेहीम वेग धरत असतानाच कृषीमंत्र्यांकडून शंभर युनिटच्या आतमधील ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा झाली. दिवाळीपूर्वी यावर निर्णय होणार होता. प्रत्यक्षात या संदर्भात कुठलाही आदेश पुढे आला नाही. तर दुसरीकडे वीज कंपनीकडील थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. जिल्ह्यात वीज कंपनीकडे १६९६ कोटी ५१ लाखांची थकबाकी आहे.
१२६२ कोटी थकलेजिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांकडे २९ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांकडे १६ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. तर कृषी पंपधारकांकडे १२६२ कोटी दोन लाखांची थकबाकी आहे. कृषीपंपधारकांकडे सर्वाधिक थकबाकी राहिली आहे. वसुलीसाठी वीज कंपनीला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.
प्रत्येक गावांमध्ये घरोघरी वीज देण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये वीज जोडणी करण्यासाठी वीज कंपनीमार्फत विविध योजना हाती घेण्यात आल्या. प्रत्येक घरांपर्यंत वीज देण्याचा प्रयत्न झाला. आता जिल्ह्यातील १८५३ गावांमध्ये वीज पोहोचली आहे. वीज कंपनीच्या माहितीनुसार जिल्ह्यातील कुठलेही गाव वीज जोडणीपासून शिल्लक राहिलेले नाही. प्रत्येकांना वीज मिळाली. वीज नाही असे एकही घर जिल्हाभरात नसल्याचा दावा वीज महावितरण कंपनीकडून केला जात आहे.
कृषिपंपावर भारनियमनविजेचे वितरण करताना कृषीपंपांना तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस मध्यरात्रीनंतर वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जाहीर झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत कृषीपंपांवर सिंचनासाठी रात्रीला जागल करावी लागत आहे. याशिवाय सर्वाधिक भारनियमन कृषी फिडरवरच कायम आहे. त्यामुळेच दिवसा सिंचनासाठी वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. उद्यापासून शहरात वीज चोरांविरोधात मोहीम हाती घेतली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच वीज चोरांवर कारवाई करून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माेहीम तीव्र करण्यात आली आहे.- संजय चितळे, कार्यकारी अभियंता, यवतमाळ.