भारीजवळची घटना : ट्रेलर होता रस्त्याच्या मधोमध उभालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्याच्या मधोमध उभा असलेल्या ट्रेलरवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता नागपूर मार्गावरील भारी शिवारात घडली.या अपघातात श्रीराम शंकर पद्मावार (५३), मेघा श्रीराम पद्मावार (४५) दोघेही रा.पुसद, बन्सीलाल अण्णाजी दिघाडे (५२), अपेक्षा बन्सीलाल दिघाडे (१८) दोघेही रा.वाघापूर, डॉ.सुप्रिया नामदेव राठोड (२५) रा.प्रियंकानगर, अनिता अशोक खमसे (४५), शिवा खमसे (२५) दोघेही रा.सेवानगर यवतमाळ, नारायण व्यंकट सोळंके (५१) रा.नांदेड यांच्यासह १७ प्रवासी जखमी झाले. नांदेड आगाराची नागपूर-नांदेड बस (क्र.एम.एच. २०- बीएल-३१४८) बुधवारी रात्री यवतमाळकडे येत होती. भारी गावानंतर रस्त्याच्या मधोमध ट्रेलर (क्र.सी.जी.०४/५८७७) उभा होता. ट्रेलर चालकाने कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर व लाईट लावलेला नव्हता. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे एसटी चालकाला रस्त्याच्या मधोमध उभा असलेला ट्रेलर दिसला नाही. परिणामी भरधाव वेगाने एसटी बस ट्रेलरवर मागून जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बसमधील प्रवासी चढ-उतार करणारे दारही पूर्णत: चेंदामेंदा झाले. रात्रीची वेळ असल्याने नेमका काय प्रकार घडला, याची जाणीव प्रवाशांना झाली नाही. बराच वेळ येथे गोंधळाची स्थिती होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. यातील आठ जणांना जबर दुखापत झाली. जखमी १७ प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एसटी बस चालक गोरखनाथ शामराव खरबे याच्या तक्रारीवरून ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. याचा तपास शहर ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद झळके करीत आहे.
उभ्या ट्रेलरवर बस आदळून १७ प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:58 AM