नोकरभरती : योगेश्वरी ग्रामीण विकास संस्थेचा प्रताप, पैसे उकळले, नियुक्तीही दिलीपुसद : विविध पदांची जाहिरात वर्तमान पत्रात देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या येथील योगेश्वरी ग्रामीण विकास संस्थेच्या संचालकाविरुद्ध पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. त्याने १७ महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंकुश साहेबराव राठोड रा. गौळ बु. ता. पुसद असे आरोपीचे नाव आहे. महिला सबलीकरण अभियांतर्गत महिला तंत्र निवारण समितीला कायमस्वरूपी तालुका पर्यवेक्षकाची १६ पदे, ग्रामदूत ६४ पदे, ग्राम प्रतिनिधी १०० पदे भरावयाची असल्याची जाहिरात दिली होती. त्यानुसार मोतीनगर येथील संस्थेच्या कार्यालयात अनेक सुशिक्षित बेरोजगार महिलांनी अर्ज केले. अर्ज फी २०० रुपये व सदस्य फी दीड हजार रुपये प्रत्येकीकडून संस्थेचे शाखा प्रमुख अंकुश राठोड यांनी घेतले होते. त्या सर्व महिला उमेदवारांना पैसे भरल्याची पावतीसुद्धा देण्यात आली. त्यानुसार तब्बल १७ महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या महिलांनी महिनाभर संस्थेत मानधन तत्वावर काम केले. त्या बदल्यात गावातील सक्रिय महिलांची निवड करून त्यांनी ग्राम प्रतिनिधी तयार करण्याचे काम केले. ग्रामप्रतिनिधीकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेण्याचे सांगण्यात आले. महिना पूर्ण झाल्यावर अंकुश राठोड यांना पगार मागितला असता त्याने पगार दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्नेहा मुरलीधर पट्टेवार रा. चापमनवाडी यवतमाळ यांच्यासह १७ महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून शहर पोलिसांनी शुक्रवारी आरोपी अंकुश साहेबराव राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास ठाणेदार अनिल कुरळकर करीत आहे. (प्रतिनिधी)
१७ महिलांची फसवणूक, पुसदमध्ये गुन्हा
By admin | Published: January 03, 2016 3:02 AM