लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण पोलीस बुधवारी रात्री जोडमोहा येथे गस्त घालत असताना कळंबकडून एक प्रवासी वाहन आले. पोलिसांची गाडी पाहून त्या चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. संशय आल्यावरून पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. वटबोरी येथे वाहनाची झडती घेतली असता त्यात १८ लाख १३ हजार रुपये किमतीचे आठ क्विंटल प्रतिबंधित कापूस बियाणे आढळून आले. चालकासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.रवींद्र जनार्दन बंधाटे (२८) रा. वटबोरी हा एम.एच.२७/बी.व्ही.६३६२ या वाहनातून बियाणे घेऊन येत होता. त्याने हे बियाणे धामणगावजवळील देवगाव फाट्यावरून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. सहायक फाैजदार देवराव बावणे व चालक रूपेश नेवारे यांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित बियाणे तस्करीचे नेटवर्क उघड झाले. वटबोरी येथे हा व्यवसाय मागील सहा वर्षांपासून केला जात आहे. मात्र आतापर्यंत आतापर्यंत येथे कारवाई झाली नव्हती.पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात ८ क्विंटल ६३ किलो प्रतिबंधित बियाणे आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्याही आढळून आल्या. तब्बल २६ पोत्यांमध्ये हे बियाणे भरलेले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर याची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, मोहीम अधिकारी पंकज बरडे यांच्यासह कृषीच्या विविध पथकांनी पोलीस ठाण्यात भेट दिली. या बियाण्यांचे नमुने घेतले. ग्रामीण ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून १८ लाखांचे बियाणे व सहा लाखांचे वाहन जप्त करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू असतानाच प्रतिबंधित बियाणे जिल्ह्यात पसरविले जात आहे. गुरुवारच्या वटबोरी येथील कारवाईने या बोगस धंद्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गुजरातमधून आयातगुजरातमधून १००-२०० रुपये किलोच्या भावात प्रतिबंधित बियाणे खरेदी करून त्याची बॅगमध्ये पॅकिंग केल्या जाते व ४५० ग्रॅम बियाण्यांची बॅग १००० रुपयाला विकल्या जाते. सामान्य शेतकऱ्यांना या बियाण्याची भुरळ घालून ते त्यांच्या माथी मारले जात आहे. नापिकीनंतर तक्रार करण्याची सोयही राहात नाही. शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका मुकाटपणे सहन करावा लागतो.
कृषी विभाग सुस्त
बोगस बियाणे व कीटकनाशके विक्रीत अनेक बडे मासे आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत कुणीच जाण्याचे धाडस करत नाही. कृषी विभागाची यंत्रणाही कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करते. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले हे दुष्टचक्र थांबविण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. आजही अनेक भागात बोगस बियाण्यांची विक्री सुरू आहे.