व्यवस्थापनाला खबरच नाही : नागपूरच्या ‘शिव’चा प्रताप यवतमाळ : पार्वती आॅटोमोबाईलच्या एमआयडीसी स्थित गोदामातून मोटरसायकलींची चोरी होत होती, पाहता पाहता तब्बल १८ वाहने चोरीला गेली. परंतु चोरीच्या या प्रकारापासून पार्वतीचे व्यवस्थापन अनभिज्ञ होते. घाटंजी पोलीस चोरट्याला घेऊन शोरूममध्ये हजर झाल्यानंतरच या चोरीचे बिंग फुटले. नागपुरातील शिव नामक चोरट्याने स्थानिक सदस्यांच्या मदतीने वाहन चोरीचा हा प्रताप केला होता. नेहमी नागरिक आपल्याकडील चोरीची तक्रार करतात. परंतु या प्रकरणात पोलिसांनी आधी चोर पकडला आणि नंतर या चोरीचा छडा लागला. शिव अजाबराव दलदले (२७) रा. प्लॉट नं. ५ मानेवाडा मित्रनगर नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिव दलदले याच्यावर यवतमाळातील वडगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. मागील सहा महिन्यांपासून शिव हा त्याच्या सहकार्याच्या मदतीने यवतमाळातील एमआयडीसी परिसरात असलेल्या हिरो कंपनीच्या गोडावूनमधून दुचाकीची चोरी करीत आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल १८ दुचाक्या लंपास केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. घाटंजी शहरात काही संशयित मुले कोऱ्या करकरीत नंबर नसलेल्या दुचाकी घेऊन फिरत असल्याचे आढळले. संशय बळावल्याने येथील ठाणेदार शिवा ठाकूर यांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे निर्देश गणेश आगे, सुनील दुबे, संजय वाघाडे या कर्मचाऱ्यांना दिले. त्यांनी चौघा संशयिताना ताब्यात घेतले. यात हिरो कंपनीची मेस्ट्रो गाडी घेऊन शिव दलदले हा पोलिसांच्या हाती लागला. त्याला बाजीरावचा हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घाटंजी येथील मारेगाव रोडवर असलेल्या एका शेतातून पोलिसांनी सहा नवीन गाड्या जप्त केल्या. हा गुन्हा वडगाव रोड पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात वडगाव रोड पोलिसांनी आणखी दोन गाड्या हस्तगत केल्या. ज्या मित्राच्या शेतात या गाड्या ठेवल्या होत्या. तो फरार आहे. नीलेश मारकंड रा. घाटंजी असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याच्या शोधात आहे. घाटंजी पोलिसांंनी आरोपीला अटक केल्यानंतर शोरुम चालकातर्फे ज्ञानेश्वर दिघाडे या कर्मचाऱ्याने दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दिली.आता या तक्रारीवरून सहायक उपनिरीक्षक मनोहर पवार, गजानन मिसेवार तपास करीत आहे. गोदामातून झालेल्या १८ वाहनांच्या या चोरी प्रकरणी तेथील यंत्रणा कुणी सहभागी आहे का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पार्वती आॅटोमधून १८ मोटरसायकलींची चोरी
By admin | Published: August 05, 2016 2:25 AM