यवतमाळ : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदाच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेने केली. त्यात १६ पंचायत समित्यांमधील एकंदर १८ शिक्षक ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिल्हा शिक्षक पुरस्कारा’चे मानकरी ठरले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मैनाक घोष, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पगारे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून १६ तर माध्यमिक गटातून चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. आर्णीतून भारत खडके, दारव्हातून हिंमत राठोड, दिग्रस उत्तम मनवर, घाटंजी अभय इंगळे, कळंब संदीप कोल्हे, महागाव सुरेश पांचाळ, मारेगाव मनोज लांजेवार, नेर भूषण तंबाखे, पांढरकवडा दीपक पडोळे, पुसद जगदीश जाधव, राळेगाव धनराज कचरे, उमरखेड ज्योती चिकणे, वणी हंसराज काटकर, तर यवतमाळ तालुक्यातून हेमंत अलोणे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच माध्यमिक शिक्षक गटातून पिंपळगाव येथील युवराज गेडाम, सरुळ येथील गजानन गोडसे, शिरजगाव येथील प्रगती देशकरी व पांढरकवडा येथील अब्दुल वहीद अब्दुल गफूर यांची निवड झाली आहे. मात्र हे पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वितरित न होता सोहळ्याची तारीख नंतर घोषित केली जाणार आहे.
दोघांचा डबल धमाकाविशेष म्हणजे, यामधील दोन शिक्षकांना यंदा एकाचवेळी दोन पुरस्कारांचे मानकरी होण्याचा मान मिळाला आहे. संदीप कोल्हे आणि दीपक पडोळे यांना यंदा राज्य शासनाचा ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ मंगळवारी प्रदान केला जाणार आहे. तर त्याचवेळी सोमवारी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठीही त्यांचे नाव जाहीर झाले आहे.