यवतमाळ : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी आणखी १९ रुग्णांची भर पडली आहे. चार दिवसात जिल्ह्यात ४० रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या आता ४५ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
आठवडाभरापूर्वी दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र मागील चार दिवसात तब्बल ४० रुग्णांची भर पडली आहे. रविवारी जिल्ह्यात चार बाधित आढळून आले होते. सोमवारी सहा रुग्णांची भर पडली. मंगळवारी ११ बाधित निष्पन्न झाले, तर बुधवारी तपासणीसाठी गेलेल्या एक हजार ११८ पैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४५ एवढी झाली आहे. यामध्ये ४० रुग्ण जिल्ह्यातील, तर पाचजण जिल्ह्याबाहेरील आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील १४, पुसद आणि आर्णी येथील प्रत्येकी एक, तर बाभूळगाव येथील दोन रुग्णांचा समावेश असून एक रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील आहे. बाधित आलेल्या १९ जणांमध्ये सात महिला, तर १२ पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजवर ७३ हजार २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यातील ७१ हजार १९० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १७८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.२६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.७०, तर मृत्यूदर २.४५ एवढा आहे.
गर्दीत जाणे टाळा, नियम पाळा
काही आठवड्यांपूर्वी जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर होता. मात्र या आठवड्यात वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून आरोग्य यंत्रणाही सतर्क बनली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी आता विशेष खबरदारी घ्यायला हवी. मास्कचा वापर करतानाच गर्दीत जाणेही टाळायला हवे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.