यवतमाळ : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जोडमोहा येथील दोन मित्र ठार झाले. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास जोडमोहा गावाजवळ घडली. चिंटू ऊर्फ अभिषेक संजय घुगरे (२१) व गौरव ज्ञानेश्वर धानफुले (१९) रा. जोडमोहा, अशी मृताची नावे आहेत.
सदर दोघे एमएच-३१-डीएन-६६७० या क्रमाकांच्या पल्सर दुचाकीने निघाले होते. यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील जोडमोहानजीकच्या वळणावर त्यांच्या वाहनाला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. चिंटू हा रस्त्याच्या कडेला पडून होता तर गौरव नालीमध्ये फेकला गेला. अपघातग्रस्त दुचाकी घटनास्थळापासून ८० फूट अंतरावर नालीमध्ये पडून होती.
अपघाताची माहिती मिळताच जोडमोहाच्या पोलीस पाटील सुमनताई राजूरकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क केला. तत्काळ ठाणेदार किशोर जुनघरे, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उताणे, बिट जमादार गणेश बुरबुरे, सुधाकर गदई, अविनाश वाघाडे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला रवाना करण्यात आले. या दोघांवरही मंगळवारी जोडमोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महामार्ग चौकी बंद
जोडमोहा महामार्ग पोलीस चौकी गेली काही वर्षांपासून बंद आहे. या मार्गावर अपघात झाल्यास लवकर मदत मिळत नाही. उपचाराअभावी जखमींचा जीव जातो. करंजी महामार्ग पोलिसांचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.