लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना महामारीचे अक्षरश: तांडव सुरू आहे. या मृत्युमालिकेत शनिवारीही आणखी २० जणांचा बळी गेला, तर दिवसभरात ११६३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारांच्या उंबरठ्यावर असून, मृत्युसंख्या एक हजाराच्या पलीकडे गेली.
शनिवारी झालेल्या २० मृत्यूपैकी ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, पाच डेडिकेेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये, तर चार मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. विशेष म्हणजे, यातील चार मृत जिल्ह्याबाहेरचे रहिवासी होते.
मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६०, ७०, ४९ वर्षीय पुरुष आणि ८०, ८३ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, आर्णी येथील ८० वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ६८ वर्षीय महिला, बाभूळगाव तालुक्यातील ८५ वर्षीय पुरुष, हिंगणघाट (जि. वर्धा) येथील ६० वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पांढरकवडा येथील ३०, ६० वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, दारव्हा येथील ७५ वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील ८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. यवतमाळ येथील ४९ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ५२ वर्षीय पुरुष, नांदेड येथील ६२ वर्षीय महिला आणि नागपूर येथील ४६ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या ११६३ जणांमध्ये ६५३ पुरुष आणि ५१० महिला आहेत. यात यवतमाळ येथील ३७१, दिग्रस १६३, वणी १४७, उमरखेड ९०, पांढरकवडा ६७, झरी ४९, दारव्हा ४५, घाटंजी ४५, मारेगाव ४०, बाभूळगाव ३६, महागाव २३, नेर २२, आर्णी २०, कळंब १६, पुसद १२, राळेगाव ८ आणि इतर शहरातील नऊ रुग्ण आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एकूण ६०४२ अहवाल आले. त्यापैकी ११६३ पॉझिटिव्ह, तर ४८७९ निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात ५९७२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील २८५८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. ३११४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ७०४ झाली आहे. गेल्या २४ तासांत १०११ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३९ हजार ६५९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १०७३ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२७ टक्के असून, मृत्युदर २.३० इतका आहे.