बँकांना १९१२ कोटींचे उद्दिष्ट : एकरी ५०० रूपयांची वाढ रूपेश उत्तरवार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १९१२ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. मात्र कर्जमाफीच्या चर्चेने वसुली थांबल्यामुळे बँकांना नवीन कर्ज वाटप करणे अवघड होणार आहे. यात थकबाकीदार २० हजार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जांपासून वंचित राहावे लागणार असल्याने खासगी सावकारांचे चांगलेच फावणार आहे. कर्जमाफीच्या चर्चेमुळे बँकांची वसुलीची मोहीम प्रभावीत झाली. अशा स्थितीत नवीन पीक कर्ज वाटपाचे आव्हान बँकांसमोर उभे आहे. पूर्वीचेच कर्ज वसूल न झाल्याने बँकर्स कमिटीने नव्याने कर्ज वितरित करताना एकरी ५०० रूपयांची वाढ केली. गेल्यावर्षी ओलिताच्या क्षेत्राकरिता बिटी कापसाला हेक्टरी ३४ हजार रूपये पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. यावर्षी यात एक हजारांची वाढ सुचनिवण्यात आली. यामुळे ओलिताच्या कपाशीसाठी आता हेक्टरी ३५ हजारांचे पीक कर्ज वितरित करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला हेक्टरी २६ हजार रूपयाचे पीक कर्ज देण्यात आले होते. यावर्षी यात एक हजार रूपयांची वाढ सुचविण्यात आल्याने हेक्टरी २७ हजार रूपयाचे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोरडवाहू कपाशीला प्रती हेक्टरी ३४ हजार, ज्वारीला २० हजार, बाजरी १७ हजार, तुरीला २६ हजार, मूग आणि उडीद पिकासाठी १९ हजार, हळद ७५ हजार, केळी ८४ हजार, डाळींब ८० हजार, ऊस बेने प्लॉटसाठी हेक्टरी ७२ हजार रूपयांचे पीक कर्ज मिळणार आहे. नवीन वाढीव दरानुसार पीक कर्ज वितरणाला बँकांनी शुक्रवारपासून सुरूवात केली. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्यावर्षी ४५० कोटींचे पीक कर्ज वितरित केले. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत केवळ २२२ कोटी रूपयांची वसुली झाली. ही कर्ज वसुली नवीन वाटपाच्या तुलनेत निम्मी आहे. त्यामुळे बँंकच आर्थिक अडचणीत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता जिल्हा बँकेला ४८१ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्हा बँक आधीच आर्थिक संकटात आहे. २०१४-२०१५ आणि २०१५-२०१६ च्या व्याज सवलत योजनेची रक्कमही अद्याप बँकेला मिळाली नाही. वसुलीही कमी झाली. तरीही जिल्हा बँक शेतकऱ्यांना नव्याने नवीन पीक कर्ज वितरित करणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केवळ ३८ हजार शेतकऱ्यांनाच कर्ज वितरित करू शकणार आहे. २० हजार शेतकरी थकबाकीमुळे नवीन कर्ज वाटपातून बाद होणार आहेत. परिणामी थकबाकीदार शेतकऱ्यांना अखेर सावकाराकडेच धाव घ्यावी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना आयती संधी अल्प मुदती कर्जाची परतफेड शेतकरी करीत नाही, असे काही बँकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना राष्ट्रीयीकृत बँकांनी गेल्यावर्षी कर्ज वाटपात आखडता हात घेतला होता. यावर्षीही राष्ट्रीयीकृत बँका मोजक्याच शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याची शक्यता जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना तब्बल १२८६ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट आहे. गेल्यावर्षी या बँकांचे कर्ज वाटप उद्दीष्टाच्या निम्मे होते. यावर्षीही तीच गत राहण्याची शक्यता आहे. नव्या सभासदांना कर्ज नाही खरीपाच्या हंगामाला सध्या थोडा विलंब असला, तरी बँकांकडे कर्ज वाटपाला पैसा नाही. यामुळे नवीन सभासदांना कर्ज न देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. परिणामी नवीन सभासदांना सावकारांकडेच धाव घ्यावी लागणार आहे.
२० हजार शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित
By admin | Published: April 08, 2017 12:06 AM