लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात २० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी वसंतनगर परिसरात उघडकीस आली. दरम्यान, मुलीवर अत्याचार करून संबंधित पोलिसानेच तिला गळफास लावून मारल्याची तक्रार मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून आरोप असलेल्या पोलिसाला ठाणेदारांनी ताब्यात घेतले आहे. गंगा संजय कोरडे (२०) रा. वेणी ता. पुसद असे मृत तरुणीचे नाव आहे. तर दंगल नियंत्रक पथकातील पाेलीस कर्मचारी विजय हटकर (४२) असे आरोप असलेल्या पोलिसाचे नाव आहे. हटकर हा कर्मचारी येथील वसंतनगर परिसरात किरायाच्या घरी राहतो. त्याने पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शुक्रवारी गंगाला आपल्या किरायाच्या घरी आणले. बराच वेळ उलटूनही गंगा घराबाहेर आली नाही तसेच घराचे दार आतून व बाहेरून बंद असल्याने घर मालकाचा मुलगा आकाश कृष्णा बारसकर याने पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच बारसकर यांचे घर गाठले. दरवाजा तोडून आत पाहिले असता गंगा ही गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. मुलीचे वडील संजय कोरडे यांनीही लगेच घटनास्थळ गाठले. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्यावर अत्याचार करून खून केला, अशी तक्रार त्यांनी उमरखेड पोलिसात दाखल केली. पोलिसांनी या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद केली. मुलीच्या वडिलांनी गंभीर तक्रार केल्यामुळे पोलिसांनी गंगाचा मृतदेह यवतमाळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.
पोलीस खात्यात नोकरीचे आमिष
- २० वर्षाच्या गंगाला पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उमरखेडमध्ये आणले गेले. नोकरीच्या बहाण्याने गैरफायदा घेतला गेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. गंगाने आत्महत्या केली की तिचा खून झाला, ही बाब शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार आहे.
तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दंगल नियंत्रण पथकातील रजेवर असलेला कर्मचारी विजय हटकर याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे. - अमोल माळवे, ठाणेदार, उमरखेड