यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शासनात विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. यानंतर संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत निवेदन करताना कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे सेवा समाप्त झालेल्या २०२९ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती दिली जाणार आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या १०,२७५ कर्मचाऱ्यांना शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कार्यवाही करून कामावर घेतले जाणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाला पाच महिने उलटत आहे. अजूनही ५०,३७५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. महामंडळाने केलेल्या आवाहनानुसार काही कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत, तर २० हजारांहून अधिक कर्मचारी विविध प्रकारच्या कारवाईत अडकले आहेत. बदली, बडतर्फी, निलंबन, सेवा समाप्ती अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. सेवा समाप्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये रोजंदार गट अ कर्मचारी आहेत. ते महामंडळाच्या सेवेत नव्यानेच रुजू झाले होते.
२५०० कर्मचारी रोजंदार गट अचे असून, त्यातील जवळपास संपात सहभागी झाले होते. दरम्यानच्या काळात काहीजण कामावर हजर झाले आहेत. एकूण २०२९ जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या सर्वांना ३१ मार्चपर्यंत कामावर हजर होण्याची संधी दिली आहे. हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२२ पासून पुनर्नियुक्ती दिली जाईल. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून १०,२७५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. महामंडळाच्या शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कारवाई करून त्यांनाही कामावर हजर होता येणार आहे.
३१ मार्चपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील सर्व प्रकारच्या कारवाया मागे घेतल्या जाईल, असे महामंडळाने २५ मार्च २०२२ च्या परिपत्रकानुसार स्पष्ट केले आहे. शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. बडतर्फीची नोटीस मागे घेण्यात येईल, बदल्या रद्द करून बदलीपूर्वीच्या ठिकाणी रुजू करून घेतले जाईल, शिवाय बदलीच्या ठिकाणी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीपूर्वीच्या जागी घेतले जाणार आहे, आदी बाबी या परिपत्रकात नमूद केल्या आहेत.
हजर व संपातील कर्मचारी
विभाग - कर्मचारी संख्या - कामावर हजर - संपात सहभागी
प्रशासकीय - ११९८९ - १०७५३ - १२३६
कार्यशाळा - १५७२१ - ८६८० - ७०४१
चालक - २९३०३ - ५७८४ - २३५१९
वाहक - २४६७० - ६०९१ - १८५७९