यवतमाळ : आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर जेवणाचे आयोजन होते. त्या जेवणातील शिळे अन्न बुधवारी सकाळी खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा झाली असून, या सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण ठेवण्यात आले होते. त्यातील बरेचसे जेवण शिल्लक राहिले. हे जेवण बुधवारी सकाळी काहींनी घेतले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने यातील काहींना जुलाब तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या भाविकांना तातडीने दुपारी दोनच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, आर्णी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले.
यामध्ये प्रगती संतोष जाधव (२१), बजरंग प्रल्हाद जाधव (३५), किरण नीलेश जाधव (३८), उकंडा सूर्यभान राठोड (५०), पल्लवी बजरंग जाधव (३०), सुरेखा बाबुलाल राठोड (४५), बेबी उकंडा राठोड (४०), जगदीश बाबूलाल राठोड (३२), भारत हरिश्चंद जाधव (३२), दर्पण भारत जाधव (६), नीलेश दिलीप जाधव (३५), भारती दिनेश राठोड (३०), उदयसिंग सुदाम चव्हाण (४५), रेखा गणेश राठोड (४०), नम्रता गणेश राठोड (१२), विजू गणेश जाधव (७), निर्मला दिलीप जाधव (५०), भारत संतोष जाधव (२०), दिलीप रामसिंग जाधव (७५), पूजा प्रकाश राठोड (२७) आणि सीमा जगदीश राठोड (२२) यांचा समावेश आहे. सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भवरे यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी म्हसोबा तांडा येथे भेट देऊन आढावा घेतला.