तिघांना अटक : वाहनासह आठ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त वणी : नागपूर (कामठी) येथून एका १० चाकी वाहनाने तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २१ बैलांची वणी-घुग्गुस मार्गावरील टोल नाक्याजवळ सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी तीन तस्करांना अटक करण्यात आली असून वाहनासह आठ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मोहम्मद शहबाज मोहम्मद नवाब (२७), रजा शमशीर हुसेन (२८) व मोहम्मद सादीक मोहम्मद सईद (१९) तिघेही रा.गांधीनगर कामठी असे अटकेतील तस्करांची नावे आहेत. ट्रक क्रमांक एम.एच.४०-वाय.२१६० या दहाचाकी ट्रकमध्ये २१ बैलांना निदर्यीपणे कोंबून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येत होते. याबाबत वणी पोलिसांना गुप्त माहिती मिळताच वणी-घुग्गुस मार्गावरील टोल नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी एका १० चाकी ट्रकची तपासणी केली असता, आतमध्ये २१ जनावरांचे तोंड व पाय बांधून ठेवण्यात आले होते. या जनावरांना व्यवस्थित उभेसुद्धा राहता येत नव्हते. तसेच या ट्रकमध्ये जनावरांच्या चाऱ्यापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता या जनावरांना आदिलाबादला नेण्यात येत होते. या सर्व जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या बैलांची किंमत दोन लाख ४० हजार रूपये असून वाहनासह पोलिसांनी आठ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या बैलांची तालुक्यातील रासा येथील संस्कार माऊलीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी मोहम्मद शहबाज मोहम्मद नवाब, रजा शमशीर हुसेन व मोहम्मद सादीक मोहम्मद सईदविरूद्ध कलम ११ (घ) (ड) (झ) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० सह कलम ५ (अ) (ब) महा.प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकलम ८३/१७७ नुसान गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे, महेंद्र भूते, इकबाल शेख, आशिष टेकाडे, रवी इसनकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)
कत्तलीस जाणाऱ्या २१ जनावरांची सुटका
By admin | Published: February 27, 2017 12:59 AM