सूरज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ मे महिन्याच्या प्रारंभीच ना राज्यातील पाणी प्रश्नही पेटला आहे. २३ जिल्ह्यांतील दोन हजार ६१९ गावे व सहा हजार ६२९ वाड्यांमध्ये ९४ शासकीय व खासगी तीन हजार २०९ अशा एकूण तीन हजार ३०३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा क पुरवठा करण्यात येत आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक एक हजार ६४३ टँकर सुरू असून, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५६ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात टँकरची संख्या दुपटीने वाढली आहे. दररोज टँकरची संख्या वाढत आहे. राज्यभरात पाणी प्रश्न पेटला असताना विदर्भात मात्र नो टेन्शन आहे. केवळ अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
लासलगावी पाणीप्रश्नी कडकडीत बंद
नाशिक : लासलगावसह १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला वारंवार लागणारी गळती आणि कोरडे पडलेले नांदूरमधमेश्वर धरण यामुळे २० दिवसांपासून लासलगावकर पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. परिसरातील गावांमध्ये असलेल्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ शनिवारी शहरातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे आपापली दुकाने बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला व टंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.