रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी शासनाने खरेदी केलेल्या तुरीपैकी तब्बल २३ लाख क्विंटल तूर अद्यापही गोदामातच पडून असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे यंदा खरेदी झालेली तूर साठविण्यासाठी गोदामांमध्ये जागाच नाही.गतवर्षी सहकार विभागाने नाफेडच्या माध्यमातून दहा लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात शासनाला शेवटच्या क्षणापर्यंत २५ लाख क्विंटल तूर खरेदी करावी लागली. खरेदी झालेली तूर वर्षभरापासून गोदामात पडून आहे. यामुळे या तुरीत घट येऊन नुकसान होण्याची भीती आहे. यातील सव्वादोन लाख तूर खुल्या पद्धतीने विकण्यात आली. त्यामुळे आता २३ लाख क्विंटल तूर गोदामात शिल्लक आहे. या तुरीवर प्रक्रिया करून त्याची डाळ करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. ही डाळ देवस्थान, वसतिगृह आणि राशन दुकानाला देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. त्यांच्याकडून मागणी आल्यानंतर ही तूर डाळ पुरविण्यात येईल. त्यामुळे गोदामात साठविलेली तूर बाहेर निघण्याचा मार्ग मोकळा होईल.मात्र यावर्षी राज्यभरात सव्वालाख शेतकऱ्यांनी १४ लाख क्विंटल तूर सहकार विभागाच्या माध्यमातून नाफेडला विकली. त्यामुळे आता गोदामात तूर ठेवायला जागा नाही. परिणामी अनेक खरेदी केंद्र बंद करण्यात आले. सहकार विभागाने खासगी गोदाम ताब्यात घेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. २०० किलोमीटर परिसरात खरेदी झालेली तूर ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सहकार विभाग १८ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करणार आहे. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी तूरच विकली नाही. आॅनलाईन नोंदणीचा क्रमांक न आल्याने शेतकरी काळजीत पडले आहे. दुसरीकडे खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होत आहे.सहकार विभागाने १८ एप्रिलपर्यंतच तूर खरेदी करण्याची सूचना दिली आहे. यानंतर तूर खरेदीसंदर्भात तारीख वाढविण्याचा कुठलाही निर्णय नाही. शेतकऱ्यांचे चुकारे लवकर दिले जातील. शिल्लक तुरीची डाळ केली जाईल.- सुभाष देशमुखसहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री.
वर्षभरापासून २३ लाख क्विंटल तूर गोदामात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:29 AM
गतवर्षी शासनाने खरेदी केलेल्या तुरीपैकी तब्बल २३ लाख क्विंटल तूर अद्यापही गोदामातच पडून असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
ठळक मुद्देयंदा गोदामात जागाच नाहीशासनाचे दुर्लक्ष