सूरज पाटील लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाजातील जातीयता संपविण्यासाठी आंतरजातीय विवाह योजना राबविण्यात येते. मागील काही वर्षात आंतरजातीय विवाह करण्याकडे युवापिढीचा कल वाढत आहे. समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळत असले तरी त्याला विलंबाचा आजार जडला आहे. अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थ्यांनी मागील दोन वर्षात जिल्हा परिषदेलाच सातफेरे मारले आहे. मात्र, अजूनही २३० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर, समाजकल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी दहा लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
जग बदलत असल्याचा गवगवा केला जात असला तरी जातीय विषमता माणसाच्या मनातून कायमची दूर झाली नाही. काही ठिकाणी आंतरजातीय विवाह केल्यास 'सैराट' घडविल्या जाते. मात्र, 'साथ जियेंगे साथ मरेंगे'च्या आणाभाका घेत अनेक जण आंतरजातीय विवाह करतात. या विवाहाला कुटुंबातून विरोध होत असल्याने प्रसंगी घरही सोडावे लागते. अशावेळा आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. अनेकांसाठी आंतरजातीय विवाह अनुदानाची रक्कम मोलाची असते. मात्र आंतरजातीय विवाह केलेल्या २३० जोडप्यांनी समाजकल्याण विभागात अर्ज केले. वारंवार फेरे मारून त्यांना निधी यायचा आहे, असे एकूणच आल्या पावली परत फिरावे लागले आहे. लाभार्थ्यांसाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, अशा मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी लवकरच येणार असल्याचे संकेत आहे.
आता तपासले जातेय परिपूर्ण प्रस्तावआंतरजातीय विवाहाच्या अनुदानासाठी प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी त्यात कोणत्या त्रुटी आहेत का, याची काटेकोर तपासणी केली जात आहे. यात कागदपत्रांची कमतरता असल्यास परिपूर्ण प्रस्तावच सादर करण्याचा सल्लाही दिला जात आहे.
५० हजारांच्या अनुदानातून दिलासा मिळण्याचे संकेतआंतरजातीय विवाह अनुदानाचा २ निधी लवकरच प्राप्त होण्याचे संकेत समाज कल्याण विभागाने दिले आहेत. एक कोटी दहा लाखांचा निधी प्राप्त झाल्यास ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ५० हजार रुपयाचे अनुदान 'पीएफएमएस' प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होईल.
त्रुटींच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथक नेमले१ २६ लाभार्थ्यांच्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या आहे. त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी समाजकल्याण विभागाने पथक नेमले आहे. पथकातील कर्मचारी दिलेल्या पत्त्यावर जाऊन त्रुटींची पूर्तता करण्यास सांगत आहे. तर काही जण गावात मिळाले नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे.
२३० जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहेआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र या अनुदानासाठी आता प्रतीक्षा करावी लागत आहे. असे जोडपे येरझारा मारताना झेडपीत दिसतात.
"आंतरजातीय विवाह अनुदानासाठी एक कोटी दहा लाखांच्या निधीची मागणी केली आहे. लवकरच निधी प्राप्त होणार आहे. ज्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या. त्यांचा शोध घेऊन दुरुस्ती करून घेतली जात आहे. प्राधान्यक्रमानेच निधीचे वितरण होईल. लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करताना त्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. याची खात्री करून घेतली पाहिजे."- पीयूष चव्हाण, समाजकल्याण अधिकारी