अकोला : पावसाळा लांबल्याने वर्हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. अकोला जिल्ह्यात १९.५0, वाशिम १९.५७ तर बुलडाणा जिल्ह्यात २५.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.यावर्षी प्रचंड तापमान व पावसाला होत असलेल्या विलंबामुळे वर्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यातील धरणांमधील जलपातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने वर्हाडातील पाच जिल्हय़ांतील जलसाठे ओसंडून वाहत होते. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा प्रकल्पात २0.१३ दलघमी म्हणजे २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पातूर तालुक्यातील मोर्णा या प्रकल्पात ३0 टक्के व निगरुणा धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात केवळ ३ टक्के जलसाठा शिलक्क असून, दगडपारवा प्रकल्पाचा जलसाठा शून्यपातळी खाली गेला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा सिंचन प्रकल्पात ३१ टक्के, ज्ञानगंगामध्ये ४१, मस २७ , कोराडी ४९ व पलढग धरणात २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा सिंचन प्रकल्पात १९ टक्के तर याच जिल्हय़ातील लोअरपूस धरणामध्ये ५२, सायखेडा ४३, गोकी २२, वाघाडी २८ व बोरगाव सिंचन प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी व सोनल हे मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित सात लघु प्रकल्प मिळून केवळ १९.१७ टक्के जलसाठा आहे.
वर्हाडातील चार जिल्ह्यांमध्ये २३.४0 टक्के जलसाठा
By admin | Published: July 06, 2014 7:51 PM