नागरी विकास : नगरउत्थानचा हातभार यवतमाळ : जिल्ह्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या सहा नगरपंचायतींना शासनाकडून पहिल्याच वर्षी चार कोटी रुपयांचा विकास निधी दोन टप्यात दिला जाणार आहे. जिल्ह्यातील झरी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि महागाव या नगरपंचायतींमध्ये निवडणुका पार पडल्या. झरी, राळेगाव, बाभूळगावात भाजपाची तर कळंब व मारेगावात शिवसेनेची सत्ता आली. महागावात परिवर्तनने सत्ता स्थापन केली. नगरपंचायती स्थापन झाल्या मात्र विकासाचे काय हा प्रश्न कायम आहे. या नगरपंचायतींकडे स्वत:चे उत्पन्न अल्पशे आहे. त्यामुळे गावांच्या विकासावर खर्च करण्यासाठी निधी कोठून आणावा हा प्रश्न सदस्यांना पडला होता. ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने नागरिकांच्याही विकासाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. म्हणूनच या नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये सत्ता कुणाचीही असो त्यांना चार कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातील दोन कोटी रुपये नगरउत्थान कार्यक्रमातून तर उर्वरित दोन कोटी विशेष निधी म्हणून राहणार आहे. निर्विवाद सत्ता असलेल्या राळेगाव नगरपंचायतीसाठी निधी बाबत सॉप्ट कॉर्नर ठेवावा अशी भाजपाची मागणी आहे. प्रोत्साहन म्हणून पाच कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी करण्यात आली होती. कळंब व बाभूळगावलासुध्दा अतिरिक्त निधी मिळावा म्हणून नेत्यांनी प्रयत्न करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची मागणी आहे. एकहाती सत्ता असती तर कळंब व बाभूळगावलाही अतिरिक्त निधी मिळाला असता. मात्र युतीतील योग्य समन्वयाअभावी आधी सत्ता व आता या निधीपासून वंचित राहावे लागत असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
सहा नगरपंचायतींना २४ कोटींचा निधी
By admin | Published: January 03, 2016 3:03 AM