लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्रात बेसुमार वाढलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता तेलंगणातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सखोल तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर ही तपासणी मोहीम पार पाडण्यासाठी चक्क ६३ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तेलंगणातून महाराष्ट्रात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील अनेक गावांमध्ये तेलंगणातील नागरिकांचे नातेसंबंधही आहेत. याशिवाय पांढरकवडा, घाटंजी यांसारख्या भागातून अनेक जण विविध व्यवहारांसाठी तेलंगणातील आदिलाबादपर्यंत ये-जा करीत असतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाद्वारे देशव्यापी जड वाहतूक सतत सुरू असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे.
आता महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पिंपळखुटी चेकपोस्टवर पथके नेमण्याचे आदेश केळापूर तहसीलदारांनी दिले आहेत. प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ६३ प्राध्यापकांचा समावेश असलेली २१ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाला तपासणीसाठी दिवस ठरवून देण्यात आला आहे. दिवसाचे २४ तास तीन पथकांकडून महामार्गावर नजर ठेवली जात आहे. या पथकांमध्ये प्रामुख्याने पांढरकवडा आणि पाटणबोरीतील प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे.
नेमकी कोणती तपासणी?
तेलंगणा आणि तेलंगणा मार्गे अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाची नोंदवही ठेवली जात आहे. प्रत्येक प्रवाशाचा अहवाल प्रशासनाला सादर करणे, प्रवाशांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास लगेच आरोग्य यंत्रणेला त्यांची चाचणी करण्याबाबत सूचना देणे, तेलंगणातून येणाऱ्या वाहनांमध्ये नियमावलीनुसार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास दंडात्मक कारवाई करणे आदी कामे या प्राध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.