यवतमाळ नगरपरिषद : जीपीआरएस तंत्रज्ञान, मोबाईलवरून आॅपरेट, ६५ लाखांची बचत यवतमाळ : विजेची बचत आणि वीज बिलाच्या खर्चात काटकसर करण्याचे धोरण नगरपरिषदेने ठरविले असून लवकरच यवतमाळ शहरातील रस्ते एलईडीच्या प्रकाशाने उजळणार आहे. २४ हजार एलईडी लाईट शहरात लावले जाणार असून लाईट जीपीआरएस सिस्टीमने कनेक्ट केले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रणाली मोबाईलवरूनच आॅपरेट करता येणार आहे. यवतमाळ शहरात असलेल्या पथदिव्यांचे वीज बिल वर्षाकाठी २० लाखांच्या घरात असते. तसेच विजेचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो. हा प्रकार टाळण्यासाठी नगरपरिषदेने आता शहरातील सर्व परंपरागत पथदिव्यांवरील लाईट आणि ट्युब लाईट बदलविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या प्रणालीमुळे वर्षाकाठी देखभालीचा खर्च ५० लाख आहे. तसेच लाईट चालू आणि बंद करण्यासाठी दहा लाखांचे कंत्राट व तपासणीसाठी पाच लाख खर्च होतो. एवढा मोठा खर्च करुनही पथदिवे बंद असल्याची ओरड होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्युत अभियंता सुप्रिया रिठे यांनी एलईडी लाईट संदर्भात स्वतंत्र आराखडा तयार केला. तसेच एलईडी लाईट दोन ते तीन वर्ष टिकतात. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील. वीज बिलही आठ लाख रुपयेच येणार असल्याचे त्यांनी आपल्या आराखड्यात सांगितले. या आराखड्याला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी आता निविदा बोलविण्यात आल्या आहे. बीओटी तत्वावर एलईडी लाईट लावण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. यामुळे नगरपरिषदेची वार्षिक ६५ लाख रुपयांची बचत होणार आहे. १ आॅगस्टपर्यंत निविदा बोलविण्यात आल्या आहे. यातील सक्षम कंपनीची निविदा मंजूर करण्यात येईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात शहर एलईडीच्या प्रकाशाने उजाळून निघणार आहे. त्यासाठी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे नगरपरिषदेच्या विद्युत अभियंता सुप्रिया रिठे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
२४ हजार एलईडींनी उजळणार शहर
By admin | Published: July 28, 2016 12:55 AM