यवतमाळ : पावसाअभावी खरीप हंगाम बुडाल्याने दुष्काळात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २४५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या या रकमेची प्रतीक्षा आहे. सरासरी पीक आणेवारी ५० टक्क्याच्या आत आल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला. पीक बुडालेल्या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. सुमारे साडेचार हजार रुपये प्रति हेक्टर मदत गतवर्षी दिली गेली होती. यंदाही हाच निकष कायम राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी २४५ कोटी रुपये मदत वाटपासाठी प्राप्त झाले होते. यंदाही तेवढीच रक्कम लागणार आहे. जिल्ह्यातील दोन हजार ५३ गावांमधील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे. नजर आणेवारीच्या पहिल्या टप्प्यानुसार नऊ लाख रुपयांची मागणी केली गेली होती. मात्र त्यातही केवळ पाच लाख मंजूर करण्यात आले. आता मदतीचे आणखी दोन टप्पे राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नेमकी किती रक्कम मदत वाटपासाठी हवी याची मागणी नोंदविली जात नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे सहकारी बँकेपुढे पुढील कर्जासाठी आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सक्तीची कर्ज वसुली बंद आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांसाठी हवे २४५ कोटी
By admin | Published: January 09, 2016 2:54 AM