उमरखेड : आपल्या विविध मागण्यांसाठी तब्बल महिनाभरापासून बेमुदत संप पुकारणाऱ्या सुवर्णकारांच्या संयमाचा बांध आता फुटला असून उमरखेड येथे २५ सुवर्णकारांनी रविवारी मुंडण करून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच शनिवारपासून साखळी उपोषण सुरू केले असून सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.गत महिनाभरापासून उमरखेड शहरातील सराफा व्यावसायिक संपात सहभागी झाले आहे. यासोबतच तालुक्यातील इतर ठिकाणचे सराफा व्यवसाय बंद आहे. केंद्र शासन मागण्या मान्य करीत नसल्याने २६ मार्चपासून सराफा व्यावसायिकांनी शहरातील गांधी चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यात प्रकाश आर्य, कैलास उदावंत, भगवान उदावंत, दिलीप शहाणे, गजानन नाशिककर, बालाजी शिंदे, रमाकांत टाक, सुरज कुलथे, मारोती उदावंत, विक्रम उदावंत, विक्रम वर्मा, चंदू वर्मा, सतीश श्रीरामजवार, अनिल महामुने, अंबादास शहाणे, अतुल पतेवार, श्याम रत्नपारखी, दिलीप शहाणे, प्रदीप महामुने, श्याम उदावंत आदी सहभागी झाले आहे. केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी उपोषण मंडपातच रविवारी २५ जणांनी मुंडण केले. उपोषण मंडपाला आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, शहर भाजपाध्यक्ष महेश काळेश्वरकर, लक्ष्मीकांत मैंद, विजय गुजरे यांनी भेटी दिल्या. दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी उमरखेड उपविभागातील सराफा व्यावसायिक सोमवार २८ मार्च रोजी येथील उपविभागीय कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश आर्य यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड येथे २५ सुवर्णकारांचे मुंडण
By admin | Published: March 28, 2016 2:20 AM