प्रवीण पिन्नमवारलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री-अपरात्री ट्रकचालकांना अडवून त्यांचे हातपाय बांधून मारहाण करीत ट्रकमधील माल व चालकाकडील रोख रक्कम लुटून नेणारी आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या टोळीने बुधवारी रात्री मराठवाकडी गावालगत औषधांचा कंटेनर लुटला. यात तब्बल २५ लाख रुपये किमतीचा औषध साठा लुटारुंनी लंपास केला. ८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान महामार्गावरील मराठवाकडी गावालगत घडली. यात कंटेनरचालक लखन जयराम जाटाव (२४) रा. तालोळी, दुसरा वाहनचालक बालचंद सेन (रा.दाबली कला जिल्हा राजगड) हे दोघे हैद्राबाद येथील रेड्डीज कंपनीच्या औषधांनी भरलेला कंटेनर (क्रमांक एच आर ४७ डी९२१९) घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील मराठवाकडी गावाजवळ एका ट्रकने कंटेनरला अडविले. पाठोपाठ मागाहून एक पांढऱ्या रंगाची कार आली. या कारमधून उतरलेल्या तीन लुटारुंनी कंटेनरच्या कॅबिनमध्ये चढून दोन्ही वाहनचालकांना धमकावले. त्यानंतर दोघांच्याही डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना खाली उतरविले. रस्त्यालगतच्या शेतात नेऊन दोघांचेही हातपाय बांधले. त्यानंतर औषधाने भरलेला कंटेनर कोंघारा गावालगत नेऊन त्यातील २५ लाख रुपये किमतीचा औषधसाठा या लुटारुंनी पळवून नेला. दरम्यान, कंटेनर चालकांनी स्वत:ची कशीबशी सुटका करत घडलेला घटनाक्रम कंपनीच्या अधिकाऱ्यांना व पांढरकवडा पोलिसांना दिला. चोरट्यांनी ४९४ औषधांचे बॉक्स व कॅबिनमधील ६ हजार रुपये असा एकूण २५ लाख ६ हजार रुपयांचा माल लुटून नेला. पोलिसांनी लुटारुंविरुद्ध ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून तीन पथके - दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके गठीत करण्यात आली आहे. यातील एक पथक मध्य प्रदेश, तर दुसरे पथक हैदराबादकडे रवाना करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले, जमादार वसंत चव्हाण, नायक पोलीस शिपाई शंकर बारेकर, राजू मोहुर्ले, राजू बेलेवार, सतीश काकडे व यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी करीत आहेत.पेट्रोलिंगअभावी महामार्गाची सुरक्षा आली धोक्यात- महामार्गावरील वडकी ते पिंपळखुटी हे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरासाठी पांढरकवडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी वाहनाद्वारे पेट्रोलिंग करीत असतात. पांढरकवडा पोलीस ठाण्यात ९७ च्या जवळपास कर्मचारी मंजूर आहेत. प्रत्यक्षात ५८ कर्मचारी कार्यरत असल्याने शहरासह महामार्ग सांभाळणे पोलिसांसाठी जिकिरीचे ठरत आहे.
यापूर्वीही दोन घटना, महामार्गावरून जाताना रहा सजग- २९ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा वाहन (क्रमांक एपी ३९ टीडी ८०५१) घेऊन चालक पुलया मोगोली (३०) रा. नेल्लोर, आंध्र प्रदेश हा नागपूर येथून हैद्राबादकडे जात असताना साखरा उड्डाण पुलाजवळ तीन लुटारुंनी तीन लाख १० हजार रूपये जबरीने चोरून नेले. १८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता साखरा उड्डाण पुलाजवळ ट्रकचालक सुधीर सुभाष राठोड (३२) रा. वडसा (ता. दारव्हा) हा आपल्या ट्रकने उमरीकडून वणीकडे जात असताना ४ अनोळखी इसमानी ट्रकला दगड फेकून मारला. त्यामुळे सुधीर राठोड याने ट्रकचा वेग कमी केला. याचवेळी चार अनोळखी व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरले. त्यांनी चालकाला बाजूच्या शेतात नेऊन हातपाय बांधून ठेवून मारहाण केली.