पावसाची प्रतीक्षा : १५ हजार हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न मुळावा : उमरखेड तालुक्यातील इसापूर जलाशयात सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १५ हजार ९३७ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलाशयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के पाणीसाठा राखीव ठेऊन सिंचनासाठी पाणी सोडण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांकडे आहे. आता पावसाळा संपत आला असताना जलाशयात पाणीसाठा न वाढल्यास सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. जलाशयाच्या डाव्या कालव्याची लांबी ८४ किलोमीटर आहे. विदर्भातील उमरखेड, मुळावा, ढाणकी, बिटरगाव या भागातून जातो. एकूण १५ हजार ९३७ हेक्टर जमीन या कालव्यांतर्गत बारमाही व हंगामी ओलित होते. उजवा कालवा मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यातून बाळापूर, हदगाव, भोकर, कळमनूरी, किनवट या भागातून जातो. या कलव्याची लांबी १८५ किलोमीटर एवढी आहे. या कालव्यातून सुमारे ७९ हजार ७०२ हेक्टर जमिनीमध्ये सिंचन केले जाते. जलाशयाची एकूण क्षमता १२७९.०६३१ दलघमी एवढी असून, त्यापैकी ९६४.९५४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. आज रोजी २४२.०० दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. किमान ५० टक्के पाणीसाठा राखीव ठेऊन सिंचनासाठी देण्याचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांकडे असल्याचीे माहिती शाखाधिकारी गणेश भडबन्सी यांनी दिली. जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध न झाल्यास मराठवाडा व विदर्भातून ९५ हजार ६३९ हेक्टर जमिनीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामुळे बुडण्याचा तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. परंतु अद्यापही परिसरातील शेतकऱ्यांना जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी आशा आहे. यावर्षी पावसाळ््यात पुरेसा पाऊस न झाल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
इसापूर जलाशयात २५ टक्के पाणीसाठा
By admin | Published: September 16, 2015 3:14 AM