लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेताची मोजणी करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांसह दोघांना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. बबन सोयाम व अविनाश पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेताची मोजणी करून घ्यायची होती. ही मोजणी तातडीने करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याला २५ हजारांची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने यापूर्वी पाच हजार रुपये या कर्मचाऱ्यांना दिले. उर्वरित २० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची या कर्मचाऱ्यांनी मागणी केली. त्यामुळे या शेतकऱ्याने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची दखल घेत, एसीबीच्या पथकाने मंगळवारी मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी अविनाश चंद्रकांत पाटील या लिपिकाने १५ हजारांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला व उपअधीक्षक बबन सोयाम याला ताब्यात घेतले. ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, नायक पोलीस युवराज राठोड, नीलेश महिंगे, सतीश किटकुले यांनी पार पाडली.