लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस महासंचालकांच्या निर्देशावरून दोन व त्यापेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांची कुंडली जिल्हा पोलीस प्रशासनाने तयार केली आहे. तब्बल दोन हजार ६२९ गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. दोन सक्रिय गुंडांवर एमपीडीएचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. टू-प्लस अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील सहाही पोलीस उपविभागातून गुन्हेगारांचा डाटा गोळा करण्यात आला. यातून दोन हजार ६२९ जणांची यादी तयार केली. त्यामध्ये एमपीडीए अंतर्गत ४९ जणांची नावे आहे. त्यात शरीर दुखापतीचे गुन्हे करणारे २२, मालमत्ताविषयक गुन्हे करणारे नऊ, अवैध दारू गाळप व विक्री करणारे १८ आहे. १७६ जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे. त्यात शरीर दुखापत करणारे १३५, मालमत्तेचे गुन्हे करणारे ४३ जण आहे. शिक्षा झालेल्या व शिक्षेस पात्र असलेल्या ६८ गुन्हेगारांची यादी आहे. त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. मालमत्तेविषयक गुन्हे असणारे आठ, अवैध व्यवसाय करणारे दोन व अवैध जुगार भरविणारे-खेळणाऱ्या ५८ जणांचा समावेश आहे. सीआरपीसी ११० अंतर्गत एक हजार चार जणांविरुद्ध कारवाई होणार आहे. शरीर दुखापत करणारे ३५६, मालमत्ताविषयक गुन्हे करणारे १५७ व मटका, जुगार व सट्टा खेळणारे ४९१ जणांवर कारवाई होणार आहे. अवैध दारू गाळप करणाऱ्या एक हजार २२६ जणांची यादी तयार झाली आहे. लवकरच हे प्रस्ताव मंजुरीस दाखल करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक माधुरी बाविस्कर उपस्थित होत्या.
१८४ रेती घाटांवर पोलिसांचा वॉच- जिल्ह्यातील १८४ रेती घाटांचा लिलाव झालेला नाही केवळ १६ रेती घाटांचा लिलाव झाला आहे. या १८४ रेती घाटांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. यवतमाळ शहरासह इतर भागात अवैधरीत्या साठविलेल्या रेती साठ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. रेती तस्करांना एमपीडीए अंतर्गत डांबण्याकरिता कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले.
गुन्हेगारांच्या ३१ टोळ्या- जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांच्या ३१ टोळ्या असून शरीर दुखापतीचे गुन्हे करणारे ५४ तर मालमत्ताविषयक गुन्हे करणारे ५१ सदस्य या टोळ्यांमध्ये सक्रिय आहे. या ३१ टोळ्यातील १०५ गुन्हेगारांची टोळी तयार केली आहे.
कुख्यात अक्षय राठोडच्या मुसक्या आवळणार - कुख्यात गँगस्टर व रेती तस्कर अक्षय राठोड याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश आला आहे. त्याला लवकरच अटक करून कारागृहात पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी २७ मे रोजी राजू ढोलाराव बावणे रा. वाठोड ता. केळापूर याला एमपीडीए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. एमपीडीएचे प्रस्ताव शासन स्तरावर असलेल्या समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येत आहे. हे प्रस्ताव मंजूर होतील याकरिता पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. दिलीप भुजबळ यांनी सांगितले.