यवतमाळ : शहरालगतच्या जांब शिवारात आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे सोमवारी धाड टाकून जिल्हा परिषदेचे माजी सदस्यासह २७ जुगारी व ११ लाख ७१ हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईतून वडगाव परिसरातील जुगार अड्डे पुन्हा चर्चेत आले आहेत.
शेतमालक संजय लंगोटे यांच्या शेतात बंद खोलीत जुगार सुरू होता. गोपनीय माहितीद्वारे येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकली. जुगार खेळताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण बाबाराव उईके (रा. भांबराजा), जावेद सलीम सोळंकी, अब्दुल वसीम अब्दुल मजीद (रा. अमरावती), शेख इरफान शेख जब्बार (रा. यवतमाळ), मंगेश बाबाराव जाेगे (रा. रुईवाई), शेख इर्शाद शेख निजाम (रा. नेर), नारायण बानूसिंग राठोड (रा. यवतमाळ), महेश अशोक घोडमारे (रा. यवतमाळ), विक्रम हेमराज भोसले, ऋषभ यादवराव बोबडे, मजीद खान समशेर खान पठाण, रुपेश पुंडलिक शहाकार, दिलशाद खान युसुफ खान पठाण (सर्व रा. यवतमाळ), नितेश केशवराव ओंकार (रा. राळेगाव), कादर खान शाहीद खान (रा. अमरावती), विजय रघुनाथ पारधी (रा. घाटंजी), सुनीलसिंग बावरी (रा. वरुड अमरावती), राजू बानूमल झामवाणी (रा. अमरावती), अमोल श्यामराव घुसे (रा. वर्धा), प्रवीण सुधाकर पवार (रा. घाटंजी), कार्तिक भैयाजी जीवने (रा. यवतमाळ), मोहंमद सोहेल अब्दुल रहीम (रा. नेर), शुभम दिगांबर वैरागडे (रा. यवतमाळ), बंटी सुनील ठाकरे (रा. मालखेड), अब्दुल वाजिद अब्दुल रफीक, शेख वसीम शेख रऊफ (रा. अमरावती) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून रोख ११ लाख ७१ हजार १४० रुपये जप्त केले. तसेच २५ मोबाइल, दहा दुचाकी, तीन चारचाकी असा एकूण ३९ लाख ९२ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत शेत मालक संजय लंगोटे याला सुद्धा आरोपी करण्यात आले आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक राहुल गुहे, जमादार सय्यद साजीद, बंडू डांगे, अजय डोळे, विनोद राठोड, नीलेश राठोड, रितूराज मेढवे, धनराज श्रीरामे यांनी केली.
आलिशान फार्म हाऊसवर कारवाई कधी ?
राजाश्रय असलेल्या आलिशान फार्म हाऊसवर क्रिकेट बुकींसह मोठा जुगार क्लब सुरू आहे. येथे महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातूनही जुगारी खेळण्यासाठी येतात. या जुगार अड्ड्यावर कारवाईचे धाडस पोलिस कधी दाखविणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात बिनधानस्तपणे मटका व जुगार अड्डे सुरू झाले आहेत. एलसीबीने ॲक्शन मोडवर येऊन जांब शिवारातील कारवाई प्रमाणेच इतरही अड्डे उद्ध्वस्त करावे, जेणेकरून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.