लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले कपाशीचे बियाणे कर्नाटकात खरेदी करून ते बोलेरो पीक वाहनाने नागपूरकडे नेले जात असताना पाटणबोरी ते पांढरकवडा राष्ट्रीय महार्गावरील मराठवाकडी गावाजवळ पांढरकवडा पोलिसांनी हे वाहन अडवून २८ लाख ५२ हजार ३१० रुपये किमतीचे बियाणे जप्त केले. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पाटणबोरी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी हे ८ एप्रिलच्या रात्री राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालीत असताना, अदिलाबाद-नागपूर मार्गावर एक बोलेरो पिकअप वाहन येत असल्याचे दिसले. या वाहनात वरच्या बाजूने प्लास्टिकचे कॅरेट होते. या कॅरेटचे वजन कमी असतानाही वाहनाचे टायर दबून असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून मराठवाकडी गावाजवळ हे वाहन अडविले. वाहन थांबवून त्या वाहनाचा चालक एन. मंजूनाथा नारायणा रेड्डी (रा. कदाबूर, कर्नाटक) याला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात प्रतिबंधित बियाणे आढळून आले. यावेळी वाहनात व्यंकटेश्वरराव आदिनारायणा डग्गुबाती (मारतुरू, आंध्र प्रदेश) हादेखील होता. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता, त्याने हे बियाणे कर्नाटक राज्यातील गौरीबिदनूर येथील गंगारेड्डी नावाच्या इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले. या कारवाईनंतर कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, राजेंद्र माळोदे, बियाणे निरीक्षक नीलेश ढाकुलवार, कृषी अधिकारी पंकज बरडे यांनी या अनधिकृत बियाणांचा पंचनामा केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, एसडीपीओ प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात एपीआय हेमराज कोळी, जमादार वसंत चव्हाण, शिपाई शंकर बारेकर, राजू सुरोशे, सिद्धार्थ कांबळे यांनी केली.
बियाणाची १४०० पाकिटे पोलिसांनी केली जप्त- भागात मी मक्त्याने शेती करीत असून त्यासाठी व काही आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी हे बियाणे घेऊन जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. वाहनात काव्या नावाचे एक हजार ४०० पाकीट (किंमत १३ लाख दोन हजार), पवनी सीडस् १६०० पाकीट (किंमत १४ लाख ८८ हजार), ३० किलो खुले बियाणे (किंमत ६२ हजार ३१० रुपये), असे एकूण २८ लाख ५२ हजार ३१० रुपयांचे बियाणे आढळून आले. हा सर्व मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला.