यवतमाळ : तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर महागाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ येथील पथकाने गुरुवारी सायंकाळी ६ वाजता तांदूळ घेवून जाणारा ट्रक संशयावरून पकडला होता. सदर ट्रकमधील धान्य रेशनचे असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ट्रकसह रेशनचा २८ टन तांदूळ जप्त करण्यात आला असून या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील तिघाजणांविरुद्ध विविध कलमान्वये महागाव ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नांदेड येथून २८ टन तांदूळ भरलेला ट्रक एमएच-४०-सीडी-०५७१ राष्ट्रीय महामार्गाने यवतमाळ मार्गे नागपूरकडे जात होता. अंबोडा येथील उड्डान पुलाजवळ पथकाने ट्रक थांबवून त्यातील चालकाकडे कागदपत्रांची विचारणा केली यावर ट्रक चालक शेख मुज्जमील शेख आलम (४५) रा. नवी आबादी नांदेड याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ट्रकची पाहणी केली असता पांढऱ्या व खाकी रंगाच्या पोत्यामध्ये तांदूळ असल्याचे आढळून आले.
पथकाने तातडीने महागाव तहसीलचे पुरवठा निरीक्षक यांचा अभिप्राय प्राप्त केला. त्यांनी सदर ट्रकमधून जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत असलेल्या धान्याची अवैध वाहतूक होत असल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर ट्रक चालकास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर माल नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील शेख रफीक शेख मेहबूब याचा असल्याचे व ट्रक प्रिन्स ट्रान्सपोर्टचे मालक सय्यद इरफान (रा. नांदेड) याचा असल्याचे सांगितले. तिघेजण संगनमत करून सुमारे ११ लाख २० हजाराचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकसह २८ टन तांदूळ जप्त केला. वरील तीनही आरोपी विरोधात महागाव पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.