टाकळीत जलशुद्धीकरण केंद्र : अडीच वर्षात प्रकल्पाचे काम पूर्र्र्ण होणार, यवतमाळकरांना मिळणार मुबलक पाणी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणी अपुरे पडते. आता बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळकडे वळते करण्यात येत आहे. ३०२ कोटींच्या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यास अडीच वर्षाचा अवधी लागणार आहे. ठरलेल्या कालावधीपूर्वीच प्राधिकरणाने युद्धपातळीवर कामाला प्रारंभ केला असून पाईपलाईन जोडणीसोबत जाकवेल आणि जलशुद्धिकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे.यवतमाळ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. भविष्यात निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणीही अपुरे पडणार आहे. यामुळे बेंबळा प्रकल्पातून यवतमाळकरांची तहान भागविण्यात येणार आहे. भविष्यात यवतमाळात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेच्या ‘अमृत’ योजनेतून हे काम हाती घेण्यात आले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून हा पेयजल प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी ३०२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.बेंबळा प्रकल्पाच्या जाकवेलचे काम प्रकल्प क्षेत्रात सुरू झाले आहे. प्रकल्प क्षेत्रालगतच्या टाकळी येथे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तेथून थेट जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत २९ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जात आहे. साडेआठ किमी पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. रस्ता रूंदीकरणासोबतच पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी डीआयके नऊ प्रकारातील पाईप वापरण्यात येत आहे. त्याचा व्यास आठशे एमएम आहे. समोरील पाईपलाईन एक हजार मीमी डायमीटरची आहे. हे पाईप वरून लोखंडी आहेत आणि आत सिमेंटचा वापर करण्यात आला. ५० वर्षापेक्षा अधिक काळ हे पाईप टिकण्याची हमी देण्यात आली आहे.नवीन तंत्रज्ञानाचा वापरकंत्राटदार कंपनीला सलग पाच वर्षे पाईपलाईनची टेस्टिंग करून द्यावी लागणार आहे. बेंबळाचे जलशुद्धिकरण केंद्र आॅटोमॅटीक आहे. पाणी भरण्यापासून ते बंद करण्याची प्रक्रिया अद्ययावत पद्धतीची आहे. पाईपलाईन लिकेज असल्यास, तसा सायरन वाजणार आहे. यामुळे कुठे बिघाड झाल्यास, त्याची माहिती तत्काळ कळणार आहे.
बेंबळातून पाणी पुरवठ्यासाठी २९ किमीची पाईपलाईन
By admin | Published: July 03, 2017 2:01 AM