महागाव : तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे. हा आकडा मतदान करणाऱ्यांचा आहे. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या एकूण तुलनेत अर्धेलोक अजूनही निरक्षर आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीची आणि आताची आकडेवारी पाहिली असता २०१७ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यामागचे नमके कारण काय असू शकते यामागचा शोध घेण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यात काळी दौ. जिल्हा परिषद गटातून काळी दौ. आणि साई ईजारा मिळून १० हजार १३८, पोखरी-हिवरा गटातून ९ हजार ६४, पेढी-गुंज गटातून ९ हजार ५४२, सवना-मोरथ गटातून ८ हजार ६९३ तर फुलसावंगी-मुडाणा गटातून ७ हजार ७७५ मतदारांनी मतदानच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत काही मतदारांना मतदान न केल्याचे कारण विचारले असता एक तर त्यांना व्होटर स्लिप मिळाल्या नाही, मतदान ओळखपत्र मिळाले नाही तर अनेकांना मतदान कधी व कुठे करायचे आहे याची कल्पनाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर काहींनी आमच्यापर्यंत कोणी आलेच नाही म्हणून आम्ही मतदानास गेलो नाही, असा अजब युक्तिवाद केला. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचेच यावरून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)
अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर
By admin | Published: February 23, 2017 1:09 AM