अविनाश साबापुरेयवतमाळ : सरकारी नोकरी लागावी म्हणून रात्रंदिवस वाट पाहणाऱ्या तीन हजार तरुणांना अचानक लाॅटरीच लागली आहे. आपल्या भविष्याचे काय होईल या चिंतेत मंगळवारी रात्री झोपी गेलेल्या तरुणांना बुधवारी सकाळी अचानक नोकरी लागल्याचा एसएमएस मिळाला. बेरोजगारीची अंधारी रात्र सरली अन् शिक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले ! ही किमया घडली पवित्र पोर्टलमुळे. शिक्षक भरतीसाठी शासनाने २०२३ मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात अभियोग्यता चाचणी घेतली होती. २१ हजार ६७८ पदांसाठी झालेल्या या परीक्षेला लाखो डीएड, बीएडधारक बसले होते. त्यातून यंदा २६ फेब्रुवारीला पहिली निवड यादी प्रसिद्ध करुन तब्बल ११ हजार ८५ तरुणांची शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. परंतु, अजूनही अनेक नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. अशा वंचितांसाठी बुधवारची सकाळ खूशखबर घेऊन आली.
पवित्र पोर्टलद्वारे मंगळवारी रात्री रुपांतरण फेरीतील (कन्व्हर्झन राउंड) निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ३ हजार १५० उमेदवारांचा समावेश आहे. यातील काही उमेदवार जिल्हा परिषदेच्या तर काही महापालिकांच्या शाळांसाठी निवडले गेलेले आहेत. त्यांची नावे संबंधित जिल्हा परिषद व महापालिकांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या लाॅगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. आता या उमेदवारांच्या कागदपत्रांची कागदपत्र पडताळणी करुन त्यांना लवकरात लवकर नियुक्त द्यावी, असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बजावले आहेत.
अशी होतेय शिक्षक भरती...- अभियोग्यता परीक्षा : फेब्रुवारी-मार्च २०२३- एकूण जागा : २१,६७८- पहिली निवड यादी : २६ फेब्रुवारी २०२४- पहिल्या यादीत निवडलेले उमेदवार : ११०८५- दुसरी निवड यादी (रुपांतरण) : २५ जून २०२४- दुसऱ्या यादीत निवडलेले उमेदवार : ३,१५०- आता उर्वरित जागा (मुलाखतीशिवाय) : २,५६४- आता उर्वरित जागा (मुलाखतीसह) : ४,८७९
दीड हजार विषय शिक्षक मिळालेकन्व्हर्टेड राउंडद्वारे पहिली ते पाचवीचे शिक्षक म्हणून १६५७ जणांची निवड झाली. त्यात इंग्रजी माध्यमासाठी ७०२, मराठी माध्यमासाठी ७६०, उर्दू माध्यमासाठी ९५, हिंदी माध्यमासाठी ९१ तर कन्नड माध्यमासाठी ९ जणांची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय सहावी ते आठवीच्या वर्गाचे विषय शिक्षक म्हणून १४८३ जणांची शिफारस झाली आहे. त्यात गणित-विज्ञानासाठी १३८२, सामाजिकशास्त्रासाठी ३ आणि भाषा विषय शिक्षक़ म्हणून ९८ जणांची निवड झाली आहे. परंतु, नववी आणि दहाव्या वर्गावर माध्यमिक शिक्षक म्हणून केवळ १० जणांची या राउंडमध्ये निवड झाली आहे.
आरक्षणानुसार मिळालेच नाही उमेदवार२६ फेब्रुवारीला मुलाखतीशिवाय निवडायच्या १६ हजार ७९९ उमेदवारांपैकी ११ हजार ८५ उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. त्यातून ५ हजार ७१४ जागा पात्र उमेदवारांअभावी उरल्या होत्या. त्यानंतर आता २५ जून रोजी यातील ३ हजार १५० जागा कन्व्हर्टेड राउंडद्वारे भरण्यात आल्या. तर अजूनही २ हजार ५६४ जागा त्या-त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार न मिळाल्याने रिक्त आहेत. आता मुलाखतीसह होणाऱ्या नियुक्त्यांकरिता पोर्टलद्वारे शिफारस कधी होणार याकडे बीएडधारकांच्या नजरा आहेत.