यवतमाळ: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि वणी विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत वणी विधानसभा मतदारसंघात ३०.३७ टक्के मतदान झाले आहे. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता कमी आहे. त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, वंचितचे राजेश बेले यांच्यासह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासूनच मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत ९.१२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत १५.५० टक्के मतदानाची नोंद झाली. तर दुपारी १ वाजेपर्यंत वणी विधानसभा मतदारसंघात ३०.३७ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, वणी शहरालगतच्या गणेशपूर येथील गौरव दादाजी लेडांगे याचा शुक्रवारी दुपारी विवाह होता. विवाहापूर्वी त्याने शहरातील गणेशपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.