उमरखेड : येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या ३५ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर सात आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीवर १५ सप्टेंबर रोजी दगडफेक झाली होती. यानंतर उमरखेड शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४२ जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. बुधवारी कोठडी संपल्याने या सर्वांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यापैकी ३५ जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली तर सात जणांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. त्यांना आणखी दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथक तयार केले असून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. उमरखेड शहरात अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संजय देशमुख, संजय पुज्जलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सदानंद मानकर, ठाणेदार अनिल पाटील, धनंजय जगदाळे आदी अधिकारी तैनात आहे. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड दगडफेकीतील ३५ आरोपी न्यायालयीन कोठडीत
By admin | Published: September 22, 2016 1:32 AM