यवतमाळ : महाराष्ट्र व तेलंगाणात मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका टोळीचा यवतमाळपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल ३५ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत येथे ही माहिती दिली.
शामराव उर्फ शाम वसंता ढगे (२४) रा. गंगानगर ता. किनवट जि. नांदेड, सैय्यद फिरोज सैय्यद नुसरत अली (२१) रा. शास्त्रीनगर आर्णी, अब्दुल कादर मोहमंद ईक्बाल धारीवाला (३२) रा. शास्त्रीनगर आर्णी जि. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही अटक करण्यात आली आहे. या टोळीने तेलंगणातील अदिलाबाद तसेच नांदेड, परभणी, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून दुचाकी वाहनांची चोरी केली. यातील शामराव ढगे हा तेलंगणापोलिसांना अनेक गुन्ह्यात हवा आहे. या टोळीत प्रथम चोरी करणारे आणि दुचाकी विकणारे यांना अटक केली.
आर्णीतील माहुर मार्गावर चोरीच्या दुचाकी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून दोघांना दुचाकीसह अटक करण्यात आली. तपासात त्यांनी विकण्यासाठी आणलेली दुचाकी २०१५ मध्ये आर्णीतच विकल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या कबुलीवरून विविध ठिकाणी ३५ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. हे आरोपी तेलंगणा, नांदेड, परभणी पोलिसांनाही हवे असून तशी मागणी त्यांनी नोंदविल्याचे एम. राज कुमार यांनी सांगितले.
पाच हजारात खरेदी, २० हजारात विक्रीबाजारपेठेत, शासकीय कार्यालयात उभी असलेल्या दुचाकीचे अगदी काही मिनिटातच लॉक तोडण्यात श्याम ढगे तरबेज आहे. तर त्याचा अल्पवयीन साथीदार हा मास्टर चाबीचा वापर करून दुचाकी लंपास करीत होता. ही दुचाकी आर्णीतील सैय्यद फिरोज व अब्दूल कादर यांच्या माध्यमातून विकण्यात येत होती. चोरट्यांकडून दोन ते पाच हजारात घेतलेली दुचाकी १० ते २० हजारात विकत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली.