यवतमाळ :जिल्हा परिषद शाळातील टॅलेंट शोधून काढण्यासाठी महादीप उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांतून टाॅप ठरलेल्या ३७ विद्यार्थ्यांना गुरुवारी विमानाने बंगळूरू, म्हैसूर हवाई सफर घडविण्यात आली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अंतिम फेरीत टाॅप ठरलेल्या या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि सायकल देऊन गौरविले. विमान प्रवासासाठी ४२ जणांची निवड झाली होती. त्यातील ३७ जण गुरुवारी विमानाने बंगळूरू, म्हैसूरला रवाना झाले. टाॅप ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११ विद्यार्थी हे घाटंजी तालुक्यातील तिवसाळा गावातील असून इतर नऊ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. विमानवारीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २४ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे कष्टकरी कुटुंबातील असून त्यांनी विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत मोठ्या कष्टाने हे यशस्वी उड्डाण घेतलेले आहे.
तिवसाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तर स्पर्धा परीक्षेचा दीड तासाचा पेपर अवघ्या १५-२० मिनिटांत सोडवून शिक्षकांनी अवाक् केले होते. याच शाळेतील ११ विद्यार्थी टाॅप ठरले आहे. टाॅप ठरलेल्या या ११ जणांमध्ये सहा मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. याशिवाय उर्दू माध्यमाचे चार विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे चार आणि एका दिव्यांग विद्यार्थ्यानेही टाॅप विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक गणवेशाचेही वाटप केले.
विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
टाॅप ठरलेल्या विद्यार्थ्यांंना जिल्हा परिषदेने महादीपच्या माध्यमातून ही हवाई सफर घडविली. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांसह पालकांचा जिल्हा परिषदेच्या सभागृहात सायकल देवून गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांंनी घेतलेले कष्ट यामुळेच हा गौरव मिळाल्याचे सांगत या पुढील काळातही अभ्यासू वृत्ती कायम ठेऊ, असा शब्द त्यांनी दिला.
शिक्षकांचेही कौतुक
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी गुरुजनांचेही कौतुक केले. त्यांनी चांगली मेहनत घेत विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषद दरवर्षी राबविणार उपक्रम
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीने महादीप उपक्रम राबविण्यात आला. एवढ्यावरच ही स्पर्धा थांबणार नाही, यापुढेही ती सुरू राहील, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत दीड तासांची स्पर्धा परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमधील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. येणाऱ्या काळात अधिकारी विद्यार्थ्यांना यात सहभागासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पांंचाळ यांनी सांगितले.
इच्छाशक्ती महत्त्वाची
जिल्हा परिषदेच्या सभागृहात कौतुक सोहळ्यात ५० पैकी ४९ गुण मिळवित पहिला आलेल्या श्रावण अडकिने आणि मुलीतून पहिली आलेल्या पलक शेलूकार यांनी भावना व्यक्त केल्या. इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, याची प्रचिती आल्याचे पलक या वेळी म्हणाली.