यवतमाळ : तालुक्यातील सावर गावाजवळ दुचाकीने जात असलेल्या दोघांना रस्त्यात थांबवून चाकूचा धाक दाखवित तिघांनी चार लाख ३० हजार ४७० रुपयांची रोख लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.नीलेश मुकींद नंदेश्वर व त्याचा मित्र सिद्धार्थ हे दोघेही भारत फायनान्स इन्क्ल्यूजन लि.मि. संभाजीनगर जयविजय चौक या कंपनीमध्ये फिल्ड असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी दिवसभर त्यांनी वाई, हातोला, आसेगाव, डेहणी, पांढुर्णा येथून बचत गटाकडे दिलेल्या कर्जाची वसुली केली. ही रक्कम घेऊन दोघेही दुचाकी सावर, गळव्हा मार्गाने यवतमाळकडे येत होते. सावर दरम्यान झुडूपात दडून असलेल्या दोघांनी अचानक पुढे येऊन दुचाकी थांबविली. तर मागे असणाऱ्या एकाने चाकूचा धाक दाखविला.
सिद्धार्थ व नीलेश या दोघांकडील रोख असलेले बॅग हिसकावून घेतल्या. नीलेशजवळच्या बॅगमध्ये १ लाख ६० हजार ९२० रुपये तर सिद्धार्थ याच्याकडील बॅगमध्ये दोन लाख ५३ हजार ५५० रुपये रोख होती. याशिवाय कंपनीचा टॅब, बायोमेट्रीक मशीन हे साहित्य होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध कलम ३९२, ३४ भादंविनुसार वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.