लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. यामुळे राज्य शासनाने खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क ३ टक्क्याने कमी केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत त्याकरिता सूट देण्यात आली होती. यामुळे मोठ्या उद्योजकांसह ठेकेदार, घर व्यावसायिक यांनी खरेदी-विक्री कार्यालयात मोठी गर्दी केली होती. १ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही उलाढाल करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला हजार ते लाख रुपयाचा भुर्दंड पडणार होता. हा भुर्दंड शासनाच्या नियमामुळे वाचला. त्याकरिता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सूट मिळणार आहे. शासनाच्या या नियमामुळे घर, स्थावर मालमत्ता, शेती यासह विविध विषयाच्या खरेदी-विक्री व्यवहाराकरिता लाभार्थ्यांना लाभ मिळाला. यातून कोट्यवधी रुपयाचे मुद्रांक शासनाच्या तिजोरीत जमा झाले. या व्यवहाराकरिता मोजकेच दिवस असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
जिल्ह्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार वाढलाजिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अधिक मुद्रांकाची विक्री झाली. राज्य शासनाने खरेदी-विक्री करावर ३ टक्क्यांची सूट दिली. यामुळे या व्यवहारात वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुका आणि इतर कारणांमुळे मुद्रांकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे. - सीमा काळेजिल्हा कोषागार अधिकारी, यवतमाळ
दहा कोटी नऊ लाखांचा महसूल मिळाला जिल्ह्यात यावर्षी ४ हजार २८७ खरेदी-विक्रीची नोंद करण्यात आली. ३१ डिसेंबरला अंतिम तारीख असल्याने सर्वाधिक गर्दी खरेदी-विक्रीच्या कार्यालयात पाहायला मिळाली. गतवर्षी ९ कोटी ७६ लाख ७२ हजार रुपयांचे स्टॅम्प विक्री झाले होते. यावर्षी १० कोटी ९ लाख ९ हजार ३०० रुपयांचे स्टॅम्प विक्री झाले. गतवर्षीच्या तुलनेत स्टॅम्पची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या स्टॅम्पवर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह ग्रामपंचायत निवडणुकीकरिताही शपथपत्र दाखल करण्यासाठी उपयोग करण्यात येतो. यामुळे यावर्षी राज्य शासनाला जादाचा महसूल मिळणार आहे.
कोरोनाच्या नियमांचा विसरखरेदी-विक्री कार्यालयात दस्तऐवज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अपुरी जागा आणि सर्वांनाच आपले दस्तऐवज लवकर दाखल व्हावेत, अशी इच्छा असल्याने प्रत्येक जण कार्यालयामध्ये दाटीवाटीने दिसत होते. काहींच्या तोंडाला मास्क होते, तर सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतरही नागरिक गर्दी करीत होते.