मुसक्या आवळणार : मोक्का, एमपीडीए, तडीपारीचे प्रस्ताव यवतमाळ : जिल्ह्यातील क्रियाशील गुंड व हिस्ट्रीशिटरच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे. असे ४० गुंड पोलिसांच्या निशाण्यावर असून मोक्का, एमपीडीए, तडीपारी या सारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू आहे. यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी सध्या शांत आहे. दोनही प्रमुख टोळ्यांच्या कुठेही उघड कारवाया नाहीत. त्यामुळे ते गेल्या काही दिवसात रेकॉर्डवर आले नाहीत. परंतु त्यांच्याच छत्रछायेत वाढणाऱ्या गल्ली बोळातील लहान-मोठ्या दादांच्या हालचाली जोरात सुरु आहे. त्यातूनच पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेखही वाढतो आहे. प्रत्येक वेळी रेकॉर्डवर मुख्य टोळी व त्याच्या म्होरक्याची नावे येत नसली तरी पाठबळ त्यांचेच राहत असल्याचे पोलीस तपासात अनेकदा पुढे आले आहे. अशा लहान टोळ्या मजबुत होऊन भविष्यात त्याचे मोठे स्वरूप होते. पर्यायाने समाजाला व पोलिसांना त्रास वाढतो. म्हणून या टोळ्यांना लहान असतानाच अटकाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शस्त्र हाती घेतले गेले आहे. जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा क्रियाशील व हिस्ट्रीशिटर मोठ्या गुन्हेगारांची यादी मागण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनविल्या गेल्या आहेत. त्या गुंडाची दहशत, सक्रियता पाहून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे स्वरूप ठरविले जाणार आहे. मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा), एमपीडीए (झोपडपट्टी दादा कायदा) आणि तडीपारी या माध्यमातून गुन्हेगारी कारवायांना लगाम लावला जाणार आहे. जिल्हाभरातील सुमारे ४० गुंडांची यादी निश्चित करण्यात आली आहे. एसडीपीओ आणि एलसीबीच्या समन्वयातून त्यांचे प्रस्ताव बनविले जात आहे. बहुतांश गुंडांना तडीपार केले जाणार आहे. त्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे पोलिसांकडून जोरदार युक्तिवादही केला जाईल. खासगीतही या गुंडांच्या कारवायांची तीव्रता पटवून देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होणार आहे. मोठ्या व तेवढ्याच धोकादायक वाटणाऱ्या गुंडांना मोक्का, एमपीडीएखाली स्थानबद्ध करण्याचा विचार केला जात आहे. तडीपारीचे काही प्रस्ताव सादर झाले आहे. तर उर्वरित प्रस्तावांवर अखेरचा हात फिरविला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)सन २०१५ मध्ये स्थानबध्दतेची एकही कारवाई नाहीजानेवारी ते डिसेंबर २०१५ या वर्षभरात यवतमाळ शहर किंवा ग्रामीण भागातील कोणत्याच गुंडावर मोक्का, एमपीडीए या सारखी स्थानबद्धतेची कारवाई केली गेली नाही. सन २०१५ मध्ये ही कारवाई निरंक असल्याचे नमूद आहे. सन २०१६ मध्ये मात्र मोक्का, एमपीडीएचे अनेक प्रस्ताव कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्याचा मानस पोलीस वर्तुळातून बोलून दाखविला जात आहे.
४० हिस्ट्रीशिटर पोलिसांच्या निशाण्यावर
By admin | Published: December 28, 2015 2:47 AM