रिक्त जागांसाठी तत्काळ जाहीरनामे लावून भरती करण्याचे असे निर्देश महिला व बालकल्याण प्रकल्प विभागीय कार्यालय अमरावती यांनी दिले आहे. मात्र, अमरावती व जिल्हा स्तरावरील निर्देश स्थानिक स्तरावर पायदळी तुडवले जात आहे. रिक्त जागा भरल्या जात नसल्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित महिला अजूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
१७ जानेवारी २०२० रोजी महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे रिक्त जागा त्वरित भरण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार अमरावती येथील आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना व यवतमाळ यांनीही शासन निर्देशाप्रमाणे रिक्त पद भरण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत वेळोवेळी सूचित केले. परंतु वरिष्ठांचे आदेश असूनही स्थानिक स्तरावर प्रकल्प कार्यालयातील मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या भरतीबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नाही. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रकल्प कार्यालयाला वारंवार स्मरणपत्र देऊन अवगत केले. तरीही जागा रिक्तच आहे.
बॉक्स
डेप्युटी सीईओंचे आदेशही टोपलीतच
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही येथील बालकल्याण प्रकल्प कार्यालयाला जागा भरण्याचे निर्देश दिले. परंतु, कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. परिणामी महिलांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे रिक्त जागा भरण्याबाबत वारंवार सूचना देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे प्रभारी प्रकल्प कार्यालय अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीसही बजावण्यात आली आहे.