पुण्यातून सुटीसाठी परतले : शेतकऱ्यांच्या मुलांना जैन संघटनेचा आधारयवतमाळ : त्यांच्या घरात चिंता होती. दोन वेळच्या जेवणाची ददात होती. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनावरही निराशेचे ढग दाटले होते. पण, पुण्याच्या वाघोली शैक्षणिक व पुनर्वसन प्रकल्पात राहून आल्यानंतर या ४२ मुलांचे चेहरेच नव्हेतर जीवनही फुलून गेले आहे!अखिल भारतीय जैन संघटना आणि लोकमत समूहाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आगळा उपक्रम सुरू केला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलण्यात आली आहे. पुसद, वणी, आर्णी, बाभूळगाव, नेर, पांढरकवडा अशा विविध तालुक्यातील एकंदर ४२ मुलांना दत्तक घेण्यात आले. गेल्या १६ जानेवारी रोजी या मुलांना केसरिया भवन येथे एकत्र करण्यात आले आणि तेथून पुणे येथील वाघोली शैक्षणिक व पुनर्वसन प्रकल्पात रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्या दर्जेदार शिक्षणासह राहण्याची, जेवणाची, आरोग्याची अद्ययावत व्यवस्था आहे.या प्रकल्पात बारावीपर्यंतच्या शिक्षणाची मोफत तजविज करण्यात आली आहे. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ही मुले प्रकल्पात राहून शनिवारी उन्हाळी सुटीसाठी यवतमाळात परतली. त्यांचे शिक्षक अशोक पवार स्वत: या मुलांसोबत आले. परत आलेली ही मुले पाहून त्यांच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुले परतली म्हणून नव्हे, तर त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला म्हणून! आधी पालकांशीही फार न बोलणारी मुले आता चार-चौघांच्या गर्दीतही धडाधड बोलू लागली आहेत. चेहऱ्यावर आत्मविश्वास परतला आहे. सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे गरिबीमुळे हरविलेला त्यांचा उपजत निरागसपणाही परतला आहे. शैक्षणिक सत्र यशस्वीपणे संपवून ४२ मुलांना अखिल भारतीय जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष गाड्यांमधून शनिवारी यवतमाळात आणले. केसरिया भवनात त्यांचे दिमाखदार स्वागतही झाले. यावेळी प्रकल्प मार्गदर्शक तथा लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, महेंद्र सुराणा, प्रसन्न दफ्तरी, सुभाषचंद आचलिया, प्रकाशचंद तातेड यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प अधिकारी विजय बुंदेला, अखिल भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद श्रीमाल, शहराध्यक्ष महेंद्र बोरा, महासचिव मनोज सेठीया, संजय बोथरा (वणी), उपाध्यक्ष अक्षय कर्णावत, कमलेश चोरडिया, रवी सिंघवी, धिरज तोरडवाल, सुभाष कोटेचा, राजेंद्र खिवसरा, कुसूमताई दफ्तरी यांच्यासह अखिल भारतीय जैन संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केसरिया भवनात मुलांचे स्वागत केले.यावेळी झालेल्या पारिवारिक कार्यक्रमात मुलांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बहुतांश पालकांनी आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाल्याचे सांगून जैन संघटना व लोकमतचे आभार मानले. तर उन्हाळी सुटीत आलेल्या छोट्या-छोट्या मुलांनीही वाघोलीच्या प्रकल्पाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. घरच्यापेक्षाही जास्त प्रेम या प्रकल्पात मिळाल्याचे मुलांनी सांगितले. उपस्थितांनी प्रकल्पात काय शिकवले, असे विचारले असता मुलांनी एका सुरात ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही प्रार्थना म्हणून पालकांनाही भारावून टाकले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करून विद्यार्थी पालकांसोबत उन्हाळी सुटीसाठी आपापल्या गावाकडे रवाना झाले.जैन संघटनेने यवतमाळ जिल्ह्यातून ४२ मुलांना शैक्षणिक व पुनर्वसन प्रकल्पासाठी दत्तक घेतले. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रभर संघटना हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विजय बुंदेला यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)सहलीतून अनुभव समृद्धीपुण्यातून परलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केसरिया भवनात आपले अनुभव सांगितले. प्रकल्पात शिकताना त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सहली नेण्यात आल्या. राज्यपाल, मुख्यमंत्री निवास अशा ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शिवाय, पुणे शहरातील प्रसिद्ध स्थळांनाही भेटी देण्यात आल्या. यातून मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करण्यात येत आहे. गॅदरिंगमध्येही मुलांना त्यांच्या आवडीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते.आईलाही रोजगार मिळालाआर्णी तालुक्यातील पळसवाडा येथील वनिता जाधव या महिलेने आपली दोन्ही अपत्ये पुण्याच्या प्रकल्पात पाठविली. मुलगा आणि मुलगी दोन्ही पुण्यात गेल्यावर आपणच एकटे घरी कशाला राहायचे, हा विचार करून त्यांनी भारतीय जैन संघटनेकडे स्वत:साठी रोजगाराची विनंती केली. त्यानुसार, वनिता जाधव यांना पुण्याच्या प्रकल्पात काम देण्यात आले. त्या आपल्या मुलांसोबतच पुण्यात राहतात. शनिवारी उन्हाळी सुटीत मुलांसोबत त्याही आपल्या गावात परतल्या.
४२ फुले... उमलून आलेली!
By admin | Published: April 10, 2016 2:51 AM