जिल्हा नियोजन समिती : अविरोध निवडीचा प्रयत्न सुरूच लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या ३१ जागांसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी सवपक्षीय सदस्यांनी अर्ज दाखल केले. ३१ जागांसाठी ४४ अर्ज आल्याने आता पक्षांतर्गत बंडोबांना थांबविण्याचे आव्हान नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून जागांचे वाटप करून घेतले आहे. ही निवडणूक अविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद व नगरपंचायत सदस्यांची नियोजन समितीवर तीन मतदार संघातून निवड केली जाणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवापर्यंत मुदत होती. यात ग्रामीण मतदार संघातील २४ जागांसाठी २७ अर्ज दाखल झाले. लहान नागरी मतदार संघातील सहा जागांकरिता १४, संक्रमणकालीन मतदारसंघातील एका जागेसाठी तीन अर्ज आले आहे. त्यात जिल्हा परिषदेतून भाजप, शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी आठ, तर काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी चार देण्याचे निश्चित झाले. नगरपरिषदेच्या सहा जागांसाठी सर्वच पक्षांकडून प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले. नगरपंचायतीची एक जागा भाजपाला देण्यात आली आहे. पक्षीय नेत्यांच्या सर्वानुमताच्या फॉर्म्युल्यानुसार मात्र प्रत्यक्ष नामांकन दाखल झाले नाही. राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांनी ग्रामीण मतदार संघात नामांकन दाखल केले. शिवसेनेकडून आठऐवजी नऊ, तर काँग्रेसनेही चारऐवजी पाच अर्ज दाखल केले. नगरपरिषदेतून राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाल्याने सहा जागांसाठी आठ अर्ज झाले. नगरपंचायतीतही अपक्षांनी अर्ज दाखल केले.
३१ जागांसाठी ४४ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 2:20 AM