वणी बाजार समिती : काँग्रेस-शिवसेनाविरूद्ध भाजप-राष्ट्रवादी-एकरे गटात लढतवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदांसाठी तब्बल ४६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना युतीविरूद्ध भाजप-राष्ट्रवादी आणि अॅड.विनायक एकरे यांच्या आघाडीची प्रमुख लढत होणार आहे.तब्बल सात वर्षानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सुरूवातीला तब्बल १५२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे १४१ अर्ज कायम होते. यात काही उमेदवारंचे दोन अर्ज होते. सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८४ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता १९ जागांसाठी ४६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.१९ संचालकांमध्ये व्यापारी व अडते गटातून दोन, हमाल व मापारी गटातून एक, सहकारी संस्था मतदार संघातून ११, ग्रामपंचायत गटातून चार, तर पणन प्रक्रिया गटातून एक, असे उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. सोसायटी मतदार संघातील ११ पैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित आहे. सोमवारी उमेदवार अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता २५ मे रोजी चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यानंतर १९ जूनला मतदान होणार आहे.ही निवडणूक जाहीर होताच काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह अॅड.विनायक एकरे यांनी विचारमंथन सुरू केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेमकी कोण कुणासोबत युती करणार, याबाबत संभ्रम कायम होता. अखेर सोमवारी या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांची युती स्पष्ट झाली. तसेच भाजप-राष्ट्रवादी आणि अॅड.विनायक एकरे यांचीही युती स्पष्ट झाली. त्यामुळे आता या दोन गटांमध्येच खरी लढत होण्याची शक्यता आहे. तथापि काही अपक्ष उमेदवार असल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. अॅड.विनायक एकरे यांनी गेली कित्येक वर्ष बाजार समितीवर अधिराज्य गाजविले. त्यांना आत्तापर्यंत शिवसेनेची साथ लाभली होती. मात्र यावेळी शिवसेनेने काँग्रेससोबत युती केल्याने अॅड.एकरे यांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अॅड.एकरे यांनी आता भाजप व राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे. मात्र सहकार क्षेत्रात अद्याप भाजपाची पकड मजबूत नाही. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, ‘वसंत’चे अध्यक्ष अॅड.देविदास काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि अॅड.विनायक एकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणारी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)अखेर दोन वकिलांमध्येच होणार लढतबाजार समितीच्या निवडणुकीत दोन वकिलांमध्ये लढत रंगण्याची शक्यता दैनिक ‘लोकमत’ने वर्तविली होती. ही शक्यता सोमवारी तंतोतंत खरी ठरली आहे. काँग्रेस-शिवसेनेतर्फे अॅड.देविदास काळे यांच्या नेतृत्वात, तर भाजपा-राष्ट्रवादी आणि अॅड.एकरे गटातर्फे अॅड.विनायक एकरे यांच्या नेतृत्वात ही लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अखेरपर्यंत अॅड.देविदास काळे उमेदवार राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र इच्छुक उमेदवारांनी त्यांना ही निवडणूक लढण्यासाठी बाध्य केल्यामुळे आता अॅड.काळेच नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अॅड.काळे व अॅड.एकरे या दोन वकिलांमध्येच काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
१९ जागांसाठी ४६ उमेदवार
By admin | Published: May 24, 2016 12:19 AM