लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या उमरखेड येथील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन (आयपीएस) यांच्या पथकाने गुरुवारी रात्री धाड घातली. या धाडीत विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ३८ जणांना अटक करण्यात आली असून ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.उमरखेडच्या सदानंद वार्डातील नितीन सुरेशचंद्र बंग याच्या घरी हा जुगार सुरू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात उमरखेडचे प्रभारी एसडीपीओ अनुराग जैन यांनी ही धाड यशस्वी केली. या धाडीत नऊ लाख ३८ हजार ९७० रुपये रोख, चार लाख २९ हजार रुपये किंमतीचे ६५ मोबाईल, सव्वादोन लाख रुपये किंमतीच्या चार मोटर सायकली, ३० लाखांच्या चार कार व इतर साहित्य असा ४७ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हदगावच्या आठ जणांचा समावेशया धाडीमध्ये तब्बल ३८ जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये ३० जण उमरखेड तालुक्यातील तर आठ जण नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील आहे. उमरखेडच्या ३० मध्येही ढाणकीच्या काहींचा समावेश आहे.
उमरखेड ठाणे, एलसीबी अनभिज्ञ कसे?हा जुगार अड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून आणि लॉकडाऊन काळातही बहरलेला होता. तेथे मराठवाड्यातून अनेक जण नियमित खेळायला येतात. या धाडीबाबत उमरखेड पोलीस ठाण्याची यंत्रणा अनभिज्ञ होती. ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेलाही एवढ्या मोठ्या जुगार अड्ड्याचा थांगपत्ता लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. यावरून उमरखेड पोलीस ठाणे व एलसीबीच्या आशीर्वादानेच हा अड्डा सुरू असावा, असे मानले जाते.राजकीय प्रतिष्ठीत, शिक्षकांचा समावेशउमरखेडमधील या जुगार धाडीत राजकीय प्रतिष्ठीत व चार शिक्षकही रंगेहात सापडले आहेत. त्यातील तिघे यवतमाळ तर एक नांदेड जिल्ह्यातील आहे. आरोपींमध्ये माजी खासदाराचा पुतण्या, हदगावचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, तेथील महसूल कर्मचारी आदींचा समावेश आहे.